सॉरी
...
मी लहान असताना एका पोराने कुत्र्याच्या शेपटाला फटाक्याची माळ बांधली आणि बार उडवून दिला. फटाके फुटले. कुत्र्याचे शेपूट जळालं. बिचारं कुत्रं पळत सुटलं. मला फार वाईट वाटलं. त्या दिवशी त्या पोराशी माझं भांडण झालं आणि आम्ही दोघे एकमेकांशी बोलायचे बंद झालो.
त्यानंतर काही दिवसाने एका पोराने दोऱ्याला शेंगदाणा बांधला. तो कोंबडीच्या पुढ्यात टाकला. कोंबडीने शेंगदाणा गिळला. तेव्हा ते पोरगं दोरा ओढू लागलं. शेंगदाणा गळ्यात अडकला. कोंबडी ओरडू लागली. वेदनेने कण्हू लागली. मी मनोमन अस्वस्थ झालो. खूप चिडलो. भांडण नको म्हणून तसाच गप्प बसलो.
एके दिवशी रात्री विहिरीकडे गेलो होतो. तिथे काही बॅटऱ्या चमकत होत्या. मी आल्याचे पाहिल्यावर अचानक बॅटऱ्या बंद झाल्या. सगळा काळोख पडला. मग मी खिशातील मोबाईल काढून त्याची टॉर्च चमकवली. मेलेले मासे पाण्यावर तरंगत होते. जवळच्याच खांबावरून आकडा टाकून कोणीतरी पाण्यात करंट सोडला होता. ते पाहून मेंदूलाच करंट लागल्यासारखं झालं.
काही दिवसांपूर्वी गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस कुणीतरी खाऊ घातला. तिचे तोंड फाटले, जीभ फाटली अन् बिचारीने आत्महत्या केली. आज ही बातमी वाचल्यावर काळीजच फाटून गेलं. आता त्या हत्तीणीला सॉरी बोलण्याचं धाडसच होत नाही. तरीही सॉरी.... मला माफ कर. आज तुला सॉरी बोलताना जगात घडत असणाऱ्या घडामोडींवर माझं लक्ष गेलं. मग सहजच मनाला वाटून गेलं की, मुक्या जीवांना छळणाऱ्या अवलादींना आता निसर्गानेही छळायला हवे. त्यांनाही कोरोना व्हावा. त्यांच्याही घरात चक्रीवादळ घुसावे. त्यांच्याही अंगावर वीज पडावी. त्यांचेही कुटुंब वणव्यात जळून खाक व्हावे. महापुरात त्यांचे जीवन उद्ध्वस्त व्हावे आणि असे काहीच झाले नाही तर न्यायदेवतेने त्यांना फाशी द्यावी. जल्लादाने कळ ओढावी. निसर्गाशी पंगा घेतल्याची त्यांना आजन्म अद्दल घडावी.
- विक्रम