दरवाजा
प्रेमाचा निस्सीम विश्वास होता दरवाजा
नव्याने उभारत असलेल्या घरात
उजेडाची स्वप्नं पेरण्यासाठी...
असंख्य वादळाचे तडाखे सोसूनही
दरवाजा टिकून होता भक्कम
नात्यांच्या विटांचा घट्ट आधार घेऊन...
कधी कधी भांडणाचा वारा सुटायचा,
दरवाजा आपटायचा,
कडीकोयंडा आदळायचा
पण बिजागिरी मात्र हलत नव्हत्या
उत्खननात सापडलेल्या संस्कृतीसारख्या...
अनोळखी हातांचा स्पर्श झाला हँगरला
की डोअरस्टॉपर पण सावध असायचा
त्यामुळेच दरवाजा मजेत होता विनातक्रार....
पण अचानक एके दिवशी
दुरुस्तीच्या नावाखाली कुणीतरी स्क्रू ढिले केले
आणि वाढली दरवाजाची अनामिक कुरकुर...
नजरेचा साचेबद्धपणा कोलमडत असतानाच
पोकळ सहानुभूतीच्या वाळवीने पोखरला दरवाजा
आणि लागली किड आशेच्या अमर्याद किरणांना...
आता वरून ऑइलपेंट दिसत असला तरी
आतून खिंडार पडले होते
आपुलकीच्या किरणांना बुरशी लागून
संयमाची चौकट केव्हाच झिजून गेली होती
आणि चाचपडली होती अंधारात
आयुष्याची पाऊले
काळजाचा उंबरा ओलांडण्यासाठी....
पण जीव दरवाजात अडकला होता म्हणून
दरवाजा खुला करून
प्रेमाच्या जीवाणूंना मोकळा श्वास द्यायला गेलो तेव्हा
हृदयावर अतिक्रमण करुन
मानहानीचा बुलडोझर भिंतीवर येऊन धडकला
आणि दरवाजाच जमीनदोस्त झाला...
आता वखारी खूप वाढल्या आहेत शहरात,
पण प्रत्येक लाकडाचा दरवाजा नाही बनू शकत....
©️ विक्रम मारुती शिरतोडे
#RoadMap