गुरुजी काय झालं वं?
"बदली."
शिक्षण हा तसा फार प्राचीन विषय आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान सुपूर्द करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. सुरुवातीच्या काळात ऋषीमुनींच्या आश्रमात लहान मुलांना शिक्षण दिले जायचे. त्यानंतर आपल्याकडे नालंदा, सोमपूर, ओदान्तापूर, तक्षशिला आणि जग्गादाला अशी प्रचंड विद्यापीठे होती. ज्यातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत होते. परकीय आक्रमणामुळे हे सगळं उद्ध्वस्त झालं आणि पहिल्यांदा तिथेच भारतीय शिक्षण व्यवस्थेला खिंडार पडली. मग धार्मिक शिक्षणाचा काळ आला अनेक मुले यापासून वंचित राहू लागली. मुलींना तर शिक्षणच घेऊ दिले जायचे नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात १८४८ साली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने मुलींची पहिली मराठी शाळा पुणे येथील भिडे वाड्यात सुरु केली. अनेक संस्थानांमधून संस्थानिकांच्या शाळा उदयास आल्या. त्यात लॉर्ड मेकॉलेने शिक्षणपद्धतीला जन्म दिला आणि महाराष्ट्रात मराठी शाळा अस्तित्वात येऊ लागल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाले. सर्वपल्ली राधाकृष्णन पासून साने गुरुजींपर्यंत अनेक आदर्श शिक्षकांची फळी निर्माण झाली. शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचू लागली. विद्यार्थी वाढले तसे शाळा झपाट्याने वाढत गेल्या. शिक्षणव्यवस्थेत राजकारण घुसलं. शिक्षकांच्या संघटना वर डोकावू लागल्या. जग एकविसाव्या शतकात गेलं आणि महाराष्ट्रात इंग्लिश मीडियमचं पेव फुटलं. मुलांच्यातली स्पर्धा आता पालकांच्यात गेली. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना विद्यार्थ्यांची गळती लागली. त्यात शासन दरबारी आठवी पास चा निर्णय झाला. ज्याला काय येत नाय तो पण नववीत जाऊ लागला. शिक्षकांच्या मागे नोंदीचा आणि सर्वेचा सपाटाच लावला. कामाच्या व्यापात मग गुरुजी पण शांत झाले आणि मुले निवांत झाली. छडी लागे छम छम चा मंत्रच गायब केला. त्यात मराठी शाळांवरून पालकांचा विश्वास उडू लागला. पटसंख्या ढासळू लागली. सदन भागातल्या शाळा देशोधडीस लागल्या, तर दुर्गम भागातलं काय विचारूच नका... अशी अवस्था निर्माण झाली आणि अशा पार्श्वभूमीवर नितीन पवार नावाचा दिग्दर्शक "बदली" ही वेबसिरीज घेऊन आला.
कालच भावड्याचा ( Vishal Maruti Shirtode ) बदली पाहिलीस का, म्हणून फोन आला. मी पाहिली नव्हती पण दुसर्या मिनिटाला Planet Marathi OTT इंस्टॉलींग ला टाकलं. कारण Nitin Pawar या दिग्दर्शकाचे वेगवेगळे प्रयोग पहायला मला आवडतात. मुळात ज्या ठिकाणी एसटी पोहोचत नाही अशा ठिकाणी वेबसिरीज हा शब्द पोहचवण्यातच नितीन पवार यांचं मोठं योगदान आहे. बदली पहायला घेतली. सुरुवातीलाच बदली'तल्या पाटील गुरुजींची पाटण तालुक्यातील मरडवाडी या अतिशय दुर्गम भागात असणाऱ्या गावात बदली झाली आणि सुरू झाला बदली चा प्रवास....
बदली होणं म्हणजे एका शिक्षकाच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट नसते. कारण त्यातून गैरसोय होणार असते. शिवाय इथे रुळलेली गाडी दुसऱ्याच कुठल्यातरी स्टेशनवर जाणार असते. मग पुन्हा नव्याने सगळं सुरू होणार असतं. त्यामुळे बदली झाली की शिक्षक पहिल्यांदा कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या हातापाया पडायला जातात किंवा अधिकाऱ्यांना पैसे दाबून बदली रद्द करायचा प्रयत्न करतात. आज काही ठिकाणी प्रामाणिक सेवा बजावणारे गुरुजी सुद्धा आहेत पण काही ठिकाणी काहीच काम न करता केवळ पगार लाटणारे, तर काही ठिकाणी फक्त मस्टरवर सही करून दिवसभर शाळेत गैरहजर असणारे मास्तर सुद्धा आहेत. कोरोनाच्या काळात तर मुलांच्या शिक्षणाची खूप दुरावस्था झाली. शाळा चालू असून काही शिकवत नाहीत तिथे ऑनलाईन काय शिकवणार...? सगळा नुसता बट्ट्याभोळ... बदली सुद्धा अशाच एका शिक्षकाची गोष्ट आहे. जो शिक्षक आधी फक्त पाट्या टाकायचे काम करत असतो. पण अचानक मरडवाडीला बदली झाल्यावर त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव होते. फुकट पगार घेणं ही गोष्ट त्याच्या मनाला पोखरायला लागते आणि तो आपल्या शिक्षकी पेशात खऱ्या अर्थाने झोकून देतो. दुर्गम भागातली पटाअभावी बंद पडायच्या गतीला आलेली शाळा पुन्हा जोमाने उभी करतो. वाऱ्यापावसात आणि चिखलगाळात रुतून गेलेली पालकांची मानसिकता डबक्यातून बाहेर काढून नव्याने समृद्ध करतो. भर पावसात पायपीट करत मुलांना शोधून काढून शाळेत बसवतो. त्यांना शिक्षणाचा लळा लावतो आणि खरा शिक्षक कसा असावा याचे आदर्श उदाहरण बनतो. त्या पाटील गुरुजींच्या अंतर्बाह्य परिवर्तनाची नांदी म्हणजे बदली. पण केवळ एका शिक्षकात घडून आलेला बदल म्हणजे बदली नाही तर त्या शिक्षकाबरोबरच आख्ख्या गावाच्या वैचारिक भूमिकेचा तिमिरातून तेजाकडे झालेला प्रवास म्हणजे बदली आहे.
बदली पाहताना बऱ्याच गोष्टी विचार करण्यास भाग पाडतात. गावगाड्यातील अनेक छोट्या-छोट्या विषयांना दिग्दर्शकाने स्पर्श केला आहे. कुठेही अतिरंजितता न दाखवता जे आहे तसं आपल्या समोर ठेवलं आहे. वाढत चाललेले शिक्षण सम्राट, त्यातून खेडोपाडी वडापावच्या गाड्यासारख्या वाढत चाललेल्या इंग्लिश मिडीयमच्या शाळा, शिक्षणाचा झालेला बाजार, मातृभाषेवर होत असलेला अन्याय, काही शिक्षकांच्या गैरवर्तणूकीमुळे मराठी शाळेविषयी जनमाणसात पसरत असलेली घृणा, प्रत्यक्ष अनुभव न घेता विनाकारण अपप्रचार करणारी टोळकी, हे सगळं डोक्यातच जातं. पण त्यातही बदली'तला "दीपक" मात्र खूप दिलासादायक वाटतो. त्याची गावाविषयी आणि शिक्षणाविषयी असलेली तळमळ पाहून मन भारावून जाते. "मी डी. एड. पोरं शिकवायला केलंय, पोट भरायला नाय. Teaching is not only job, it's human developing program." या त्याच्या संवादाने शिक्षक होऊ पाहणाऱ्या नवतरुणांविषयी दुर्दम्य आशावाद निर्माण होतो.
बदली बालपणीच्या अंतरंगात डोकावते. प्रत्येकाला आपल्या मराठी शाळेच्या विश्वात घेऊन जाते. माझे वडील शिक्षक आहेत आणि लहानपणापासून मी अनेक शिक्षकांना जवळून पाहिलं आहे. अनुभवलं आहे. त्यामुळे मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करतो की Amol Deshmukh नी उभा केलेला पाटील गुरुजी मला खरोखरच हाडाचा शिक्षक वाटला. त्यांच्या अभिनयातील कसदारपणा आणि पात्राचा सहजरीत्या असलेला वावर पाहिल्यावर त्यांच्या भूमिकेला 100 तोफांची सलामी द्यावी वाटते. कारण या भूमिकेत त्यांनी पूर्ण जीव ओतला आहे. अत्यंत मेहनतीने त्यांनी मराठी शाळेतील प्रामाणिक शिक्षक साकारला आहे. पिंजरा सिनेमात डॉ. श्रीराम लागूंनी साकारलेला मास्तर, बनगरवाडीत चंद्रकांत कुलकर्णी यांनी साकारलेला मास्तर आणि बदलीतले पाटील गुरुजी नेहमीच लक्षात राहतील. एक मेहनती आणि अभ्यासू नट बदली'च्या निमित्ताने महाराष्ट्राला मिळाला.
बदली खूप काही शिकवून जाते. बेरोजगार तरुणांची अवस्था, तरूण विधवांचे प्रश्न, लोकांचा मराठी शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन, दुर्गम भागातील वास्तव्याचे प्रश्न, अशा एक ना अनेक बाबी बदली'तून समोर येतात. बदलीची गोष्टच मुळात भन्नाट आणि वास्तवदर्शी आहे. बदली'च्या शेवटी गुरुजींना बदलीचे लेटर येतं. ते लेटर वाचून गुरुजी अस्वस्थ होतात आणि ज्ञान्या गुरुजींना विचारतो, गुरुजी काय झालं वं? गुरूजी सांगतात बदली... तेव्हा गुरुजींच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आतून कालवाकालव होते. आपोआप डोळे पाणावतात. "गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा सानेगुरुजी व्हाल का? नीती संस्काराचे धडे पोरा माझ्या द्याल का?" हा एका कवीने उपस्थित केलेला सवाल सतत डोळ्यासमोर तरळतो. तर दुसऱ्या बाजूला शेलार गुरुजींसारख्या पगारासाठी नोकरी करणाऱ्या शिक्षकांविषयी कीव वाटत राहते.
बदली मध्ये सगळ्यांचीच मेहनत दिसून येते. प्रत्येक दृश्यातून आणि पात्रातून ते सतत जाणवत राहते. सौंदर्यशास्त्राचे व्याकरण आणि प्रतीकात्मकता अगदी सहजरित्या पण प्रभावीपणे दिग्दर्शकाने हाताळले आहे. केवळ पोस्टर वरूनच याचा प्राथमिक अंदाज आपल्याला येतो. Megha Ghadge बऱ्याच दिवसातून दिसल्या आणि त्याही हे असं ताकदीचं पात्र साकारताना.... त्यामुळे खूप भारी वाटलं. Chhaya Sangavkar यांनी सुद्धा आपल्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. Kt Pawar कोणत्याही भूमिकेत मार्केट खाऊनच जातात. बालकलाकारांच्या भूमिकेचं मात्र विशेष कौतुक करावं लागेल. एकंदरीत सर्वांनीच खूप चांगली भूमिका केलेली आहे. नितीन पवार यांची मांडणी तर नेहमीच मनाला भावते. Veerdhaval Patil यांची सिनेमॅटोग्राफी कमाल आहे. बदली'तील अनेक दृश्य डोळ्यांना अक्षरशः सुखावून टाकणारी आहेत. शिवाय निलेश महिगावकर यांचे लेखन सहाय्य आहे म्हटल्यावर कलाकृतीचा दर्जा वाढणारच....
बाकी पिंजर्यातले मास्तर सर्वांनीच पाहिले आहेत, पण आता बदली'तले पाटील गुरुजी सुद्धा नक्की पहा. मराठी वेब सिरीज विश्वात OTT प्लॅटफॉर्मवर नितीन पवारनी केलेला बदली'चा प्रयोग पाहून आता मराठीतही चांगले प्रयोग होत आहेत आणि ते OTT वर यशस्वी होऊ शकतात याची मनोमन खात्री पटली. बदलीतून तुमच्या अनेक प्रश्नांची उकल होईल. पण मला मात्र बदली पाहून अनेक प्रश्नांनी घेरलं. डोंगरदऱ्यातली माणसं शिक्षण कसं घेत असतील? त्यांच्या जगण्याच्या प्रश्र्नापुढे शिक्षणाची काय किंमत असेल? एखाद्या बाईला बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्यावर दवाखान्यात जाईपर्यंत काय अवस्था होत असेल? तडाख्याच्या पावसात हार्ट अटॅक आलेल्या माणसाचं काय झालं असेल? उच्च शिक्षण घ्यायची प्रचंड इच्छा असूनही एखाद्या मुलीला पैशाच्या आणि सुरक्षेच्या प्रश्नामुळे कॉलेजचं तोंड तरी पाहता येत असेल का? ज्यांची जिंदगी दरीत गेली अशी किती माणसं मरडवाडीत असतील? तिकडे इंटरनेटचं जग व्यापक झालं असेल का? मी दारात चारचाकी उभा करेन असं स्वप्न तिथे कोण पाहत असेल? तिकडे सरकारच्या सुविधा पोहचायला अजून किती दिवस लागतील? आशेची किरणं तिथे पोहचत असतील का? मरडवाडी सोडून गेलेली किती माणसं तिथे परत आली असतील? एखाद्या अंथरुणाशी खिळलेल्या म्हाताऱ्याने आपला मुलगा येईल आणि सगळं ठीक होईल या आशेने शेवटचा श्वास रोखून धरला असेल का? काहीवेळ डोकं सुन्न झालं होतं. पण पाटील गुरुजींनी खूप आधार दिला. बदली'तल्या पाटील गुरुजींची आज खरंच समाजाला गरज आहे. अशा गुरुजींना समाजाने साथ दिली तरच खेडोपाडीच्या दुर्गम भागातल्या मराठी शाळा वाचतील, टिकतील. पोरं शिकतील, मोठी होतील आणि जग जिंकायची स्वप्नं पाहतील.
©️ विक्रम मारुती शिरतोडे