इंजिन
तशी रेल्वेतून जातानाच बहरली
आमची प्रेमकहाणी
रेल्वेच्या गतिमान चाकांसारखी...
वेटिंग रूमच्या बर्याच पायर्या झिजवल्या
अनेकदा क्रॉसिंग झालं
कुणी मध्येच आडवा येईल म्हणून
रेड सिग्नल दाखवून फाटक सुद्धा पाडून झालं
तेव्हा कुठे गाडी पद्धशीर रुळावर आली
आणि धावू लागली भरधाव...
सगळं कसं मजेत चाललं होतं
पण शहर जवळ येईल तसे रुळ वाढत गेले
आणि जंक्शनवरच्या गर्दीमध्ये
डबे बिचारे हरवून गेले
कावऱ्याबावऱ्या अवस्थेत
एक कटाक्ष टाकला भोवती
तेव्हा समजले की,
गाडीने इंजिनच बदलले आहे...
छातीत धडधड वाढते तशी
गाडी केव्हाच निघून गेली
आणि काळजात दरड कोसळली
जुना रूट आता बंद झाला
स्टेशनवरच्या बाकड्यासहित आठवणींवर सुद्धा धूळ चढली
आणि झिजू लागले भेटींचे फलाट...
हृदयाचे इंजिन आता शोपीस म्हणून
स्टेशनच्या बाहेर लावले आहे...
येत असते ती कधीकधी सेल्फी काढायला तिच्या नवऱ्यासोबत
पण तिचा चेहरा खुलला असला
तरी इंजिन मात्र गंजले आहे.
- विक्रम मारुती शिरतोडे
#RoadMap