ठपका
कधी काळी सूर्यालाही पाझर फुटावा
आणि रखरखत्या उन्हालाही गहिवरून यावं
असं केलेलं असतं प्रेम आपण
मंगळावर सजीवसृष्टी फुलवण्याच्या स्वप्नांसारखं...
आकाशगंगेतून एखादी उल्का तुटून पडावी ताडकन्
आणि अगणित अंतराळालाही लागावेत फ्रस्ट्रेशनचे डोहाळे
असाच पचवलेला असतो आपण ब्रेकअपसुद्धा...
मग काही प्रकाशवर्ष निघून जातात हळूहळू
लुकलुकणारे तारे सुद्धा कधी कधी धुक्यात गायब होतात...
पण धूसर आठवणींच्या आयुष्यात
डोकावून पाहिले केव्हाही
तर तो चेहरा मात्र कायम स्पष्टच असतो
ज्याच्या अस्तित्वासाठी देवकणांनी ही सृष्टी निर्माण केली असावी...
विश्वाची निर्मिती आणि प्रेम
या कदाचित एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील
यावर बसतो आपला स्वतःपेक्षा जास्त विश्वास...
आणि मग अंतरंगाच्या भूगर्भात होऊ लागतात भूकंप
जाऊ लागतात हृदयाला खोलवर तडे
उध्वस्त भावनांच्या रंगहीन दुनियेत
बदलून जातो प्रेमाचा भूगोल आरपार...
काळजावर गुलाबी इतिहासाचा चिरंतन ठपका ठेवून.
©️ विक्रम मारुती शिरतोडे
#RoadMap