देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पुर्ण होताय. पुर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया धूमधडाक्यात साजरा होतोय, पण यात फक्त इंडियाच सहभागी आहे का? भारत आजपण त्याच्या मूलभूत गोष्टींसाठी लढतोय. देशाच्या स्वातंत्र्यला ७५ वर्ष पुर्ण होऊनही त्याच दिवशी कित्येक लोक उपाशी पोटी झोपतील, सकाळी लाल किल्ल्यावर जेव्हा पंतप्रधानांचे भाषण चालु राहील तेव्हा देशात कुठेतरी कर्जाच्या बोज्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असेल. अजूनही भारत रोज लढतोय दोन वेळच्या पोटापाण्यासाठी. देशाला ७५ वर्ष पूर्वी स्वातंत्र्य मिळवून सुद्धा, भारतात मुलीच्या लग्नासाठी जमीन विकून बाप हुंडा देतोय, रात्रीला भाकरीचे दोन तुकडे भेटत नाही म्हणुन कितीतरी लोकं पाणी पिऊन झोपताय, सरकारी नोकऱ्यांमधील गोंधळामुळे वर्षानुवर्षे अभ्यास करणारे तरूण आत्महत्या करताय, शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य बाजारपेठ भेटत नाहीय, व्यापारी लुटताय, लोकांना वेळेवर न्याय मिळत नाहीय, मागे एक बातमी वाचली एका मुलीवर तिच्यावर वयाच्या १० व्या वर्षी बलात्कार झाला होता तिला न्याय ७० व्या वर्षी भेटला. गुन्हेगारांपैकी २-३ मेले सुद्धा होते अशी ही आपली न्यायव्यवस्था. हिंदू - मुस्लीम रोज नविन नविन गोष्टींवरून भांडताय, मानवता कुठेतरी मरत चाललीय.. जातिजातींमध्ये तेढ निर्माण होतोय, गरिबांची मुले चांगल्या शिक्षणापासुन, पुस्तकांपासून वंचित राहताय, महागाई वाढतेय, रोज GST वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर झळकतोय, संसदेत निर्यायक चर्चा करायला कोणी तयार नाहीय, ह्या देशात कधीकाळी चंद्रशेखर, अटलजी, लोहिया होते हे तरुण भारत हळूहळू विसरतोय, विरोधक फक्त पक्षापूर्ते मर्यादित होताय, राजनेत्यांचे काम फक्त सरकार पाडणे, निवडूण आणणे, हेच झालाय, जनतेचे प्रश्न चंद्रभागेत वाहून गेलेत का?या सर्व प्रश्नांवर आपण भारतीय नागरिक म्हणून वाचा फोडण्यार तरी कधी?
लोकांनी पण हे आत्मसात करायला सुरुवात केलीय, निवडणुकांच्या आधी जनतेला रेवड्या द्यायच्या आणि निवडूण यायचं ही परंपरा बनू लागलीय, तरुण मुले ज्यांना देशाचे भविष्य म्हणतात ते सोशल मीडियावर रील टाकून इंस्टा इन्फ्लुन्सर बनू पहाताय, ४-५ सरकार विरोधात स्टोरी टाकून कुल बनू पाहाताय, काही मुले खरोखर समाजाच्या हितासाठी झटताय, युवा नेते, भावी सरपंच, भावी नगरसेवक प्रत्येक गल्लीतून रोज ट्रकभर निघताय, गावाच्या अटीतटीच्या राजकारणामुळे ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांचा कुठेतरी गळा घोटायला लागला आहे. कॉलेज मधे घुसल्या बरोबर तरुणाला क्रांतीचे स्वप्न पडताय, दारू, सिगारेट, गांजा याच्या आहारी जाऊन कित्येक मुले स्वतःचा विकास खुंटवताय, ब्रिटिशांनी जाऊनही 75 वर्षे लोटत असतानादेखील अजूनही प्रशासकीय नोकरी म्हणजेच सर्वस्व समजत MPSC,UPSC मुळे आपण कितीतरी मोठया कलाकारांना,संशोधकांना, क्रीडापट्टूनां,उद्योजकांना गमवत चाललोय, कित्येक पिढ्या मोटिवेशनल स्पिकरांमुळे बरबाद होताय, पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करण्याऐवजी राजकारण्यांचे चौथे पिल्लू म्हणुन काम करताय, तरुण रणवीर सिंगच्या नग्न फोटोवर, ललित मोदीच्या प्रेमसंबंधावर चर्चा करून वेळ घालवतोय, त्याला भोवतालचा समाज, व्यवस्था किती नग्न आहे हे दिसत नाहीय, असो... या जरी नकारत्मकता दर्शविणाऱ्या बाबी असल्या तरी,अगदी स्वातंत्र्य मिळाल्याच्या सुरवातीपासूनच आधूनकतेची गरज पाहता आईआईटी, इसरो,एनआईटी,हरित क्रांती, श्वेत क्रांती, गरिबी हटाव, पोलिओमुक्त भारत,शेजारील राष्ट्रांशी युद्धविजय,पंचवार्षिक योजना,अणुचाचण्या,राष्ट्कुल स्पर्धा ऑलम्पिक स्पर्धा, बॉलीवूड क्रिकेट, ते अलीकडे कोव्हिड वैक्सीन,या सर्व भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावणाऱ्याच बाबी कौतुकास्पद आहेत.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी सामान्यांच्या मूलभूत गरजा, शेतकऱ्यांना योग्य न्याय, मजदुरनांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला, गरिबांना योग्य शिक्षण, तृतीयपंथीना संसदेत स्थान, प्रत्येकाला दोन वेळेच्या पोटापाण्याची सोय, महिलांना त्यांच स्वातंत्र्य, तरुणांना योग्य रोजगार, संसदेत विरोधकांना बोलण्याची संधी, लोकांमधे माणुसकी, विरोधकांना ट्विटरवरुन रस्त्यावर येण्याची बुद्धी मिळो... बाकी आठवड्यापुरते देशप्रेम आणि दोन दिवसांसाठी DP बदलणे चालूच राहील... हर घर तिरंगा वैगरे पण आहेच. घर घर न्याय, समानता मूल्य, उदारमतवाद न्हेऊया. अमृतकाळातील हे विषमतेचे, असमानतेचे विष लक्षात घेतले आणि त्यावर ठोस उपाययोजना राबवल्या तर स्वातंत्र्याचा शतक महोत्सव आपण अधिक निरोगी वातावरणात साजरा करु.
आकाश अर्जुन दहे
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली