असेच काही महाराष्ट्रत सध्या घडत आहे. ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजे, कुठे वादविवाद झाला तर त्या वादविवादाचे निदान केले पाहिजे. जनता त्यांना त्यासाठी निवडून देते. त्यांच्यात काहीतरी वेगळे आहे, ते समाजाच भल करू शकतात, त्यामुळे त्यांना विधानभवनात पाठवले जाते. पण आज जे विधानभवनातील पायऱ्यांवर पाहिले ते पाहून, आपण महाराष्ट्राच्या विधान भवनाचा व्हिडिओ पाहत आहोत की एखाद्या मागासलेल्या राज्याचा पाहत आहोत असा प्रश्न पडला. महाराष्ट्र राजकीय सांस्कृती कुठेतरी विसरतोय. आम्ही इकडे बाहेरच्या राज्यात राहून महाराष्ट्र कसा राजकीय सांस्कृतिक रित्या श्रीमंत आहे याच्या फुशारक्या मारत असतो. लोकांना महाराष्ट्रात यायचे आमंत्रण देत असतो. पण सध्याचे आमचे नेते विधानभवनाच्या व्हरांड्यात गल्लीतल्या टपोरी पोरांसारखे एकमेकांसोबत भांडतात हीच आमची श्रीमंती? हाच आमचा पुढारपणा?
देशाच्या राजकारणाची, समाजप्रबोधनाची दिशा ठरवणाऱ्या राज्याची अवस्था आज अशी का झाली आणि विशेष म्हणजे इथल्या जनतेने ती का हो दिली हा मोठा प्रश्न.
ही घटना १९७२ मधली. तिला संदर्भ आहे तत्कालीन भीषण दुष्काळाचा. सरकारच्या परीने दुष्काळ निर्मूलनाची कामे सुरू होती. पण विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका सुरू होती. अशा वेळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी काय करावे? दुष्काळग्रस्त भागाच्या तसेच दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या कामाच्या पाहणी दौऱ्याला जाताना त्यांनी थेट विरोधकांनाच आपल्याबरोबर घेतले आणि सरकार काय करते आहे ते प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखवले. आज महाराष्ट्राच्या राजकीय परिप्रेक्ष्यात जो कर्कश गदारोळ सुरू आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर हे उदाहरण अगदीच वेगळे चित्र दाखवणारे, खरे म्हणजे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दाखवणारे. हे असे फक्त एक उदाहरण नाहीये असे कित्येक उदाहरण आहे तेव्हा सुद्धा मतभेद होते, पण मनभेद नव्हते. प्रत्येक जण प्रत्येकाच्या विचारधारेचा सन्मान करायचा. टीका करायचे पण टोकाची टीका, द्वेष टाळायचे. बाळासाहेब ठाकरे पवारांना मैद्याचे पोते, बारामतीचा म्हामद्या म्हणायचे, पण त्याच संध्याकाळी मातोश्रीवर पवारांच्या आणि ठाकरेंच्या गप्पा रंगायच्या हा नेत्यांमधला मोठेपणा होता. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या तर महाराष्ट्राच्या चहाच्या टप्र्यांवर गप्पा रंगतात, लोकं त्यांच्या मैत्रीच्या शपती घेतात. दोन्ही लोकं वेगवेगळ्यापक्षाची होती पण त्यांनी मैत्री अबाधित ठेवली होती.
यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, एस एस जोशी, मधु दंडवते, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला अशा उंचीवर नेऊन ठेवले की, ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ या सेनापती बापटांच्या ओळी सार्थ ठराव्यात ते पुढारपणा आज गेला कुठे असा प्रश्न पडण्याची वेळ आली.असा पुढारीपना आला कुठून याचाही शोध घ्यावा लागेल.
ते पुढारपण येण्याचे मूळ कारण शेकडो वर्षे या मातीत संतांनी केलेल्या सुविचारांच्या, सद्वर्तनाच्या शिंपणात शोधता येते. त्याची फळे किती वेगवेगळय़ा स्वरूपात दिसावीत.. सर्वसामान्य लोकांचे जीवनमानच बदलून टाकणाऱ्या कित्येक क्रांतिकारक योजना सगळय़ात आधी महाराष्ट्रात सुरू झाल्या आणि त्यापैकी अनेक योजना नंतर देशाने स्वीकारल्या. त्यातल्या निवडकांवर नजर टाकली तरी महाराष्ट्राचे पुढारपण अधोरेखित होते. स्त्रीशिक्षणाची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात केली आणि आज त्याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये मागास घटकांसाठी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण दिले. पुढे तेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशपातळीवर नेले. १९७२च्या दुष्काळाच्या काळात महाराष्ट्रात ‘रोजगार हमी योजना’ या नावाने सुरू झालेली योजना आज ‘मनरेगा’ या नावाने देशभरात कष्टकऱ्यांच्या पोटाला आधार देते आहे. यशवंतराव चव्हाणांनी आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या शिक्षण शुल्कातील सवलतीच्या योजनेचा कित्ता आज अनेक राज्यांमध्ये गिरवला जातो आहे. सहकारातून ग्रामीण विकासाचे सूत्र महाराष्ट्राने देशाला दिले. ७३व्या घटनादुरुस्तीमधून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र हेच पहिले राज्य आहे. आज देशभर ज्या स्वच्छता अभियानाचा बोलबाला सुरू आहे, त्याचीही मुळे महाराष्ट्रामधल्या दोन दशकांपूर्वीच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापर्यंत जातात. माहिती अधिकाराच्या कायद्याचा आग्रह धरणारे महाराष्ट्र हे देशामधले पहिले राज्य. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ आणणारे महाराष्ट्र हेच देशामधले पहिले राज्य!
पण आज पाहतो की राज्यकर्ते एकमेकांना शिव्याशाप देतात, एकमेकांना तुच्छ समजतात, हलकट घोषणाबाजी, पोकळ विरोध, ईडी सीडी चा वापर. आज कोणी उठतो कोणाला संपवण्याची भाषा करतो. वरांड्यात काय धक्काबुक्की करतात, वरतून हे आम्हीच केले हे आवर्जून सांगतात. ज्या गोष्टीची लाज वाटावी त्याचा अभिमानाने गवगावा करतात. जनतेने याचा तार्किक विचार करावा आणि पुढच्या वेळी मतदान करताना कोणत्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भागाचा किती विकास केला यावर मतदान कराव. ना की बाटली, नोट, मिक्सर, कुकर यावर. मागसल्यांची प्रगती होणे ही कौतुकाची बाब आहे, पण पुढारलेल्या राज्याची अधोगती होणे ही काही कौतुकाची बाब नाही आणि तो महाराष्ट्र धर्म तर नक्कीच नाही.
आकाश अर्जुन दहे
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली