मीनाक्षी अभ्यासात हुशार, हजरजबाबी होती. पदवीनंतर तिने यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. रात्रंदिवस अभ्यास करत होती. पुण्याला त्याची कोचिंग घेत होती. चार वेळा पेपर देऊन सुद्धा ती परीक्षेत पास झाली नाही. काही मार्क्स ने तीची परीक्षा कायम हुकत होती. तिला आता वाटू लागले बस... तिला तोच तोच अभ्यास तीन-चार वर्षांपासून करून विट आला होता. आपल्या सोबतचे लोक कमवायला लागले होते. तिला पैशासाठी आई-वडिलांवर अवलंबून राहायचे नव्हते. तिने घरी ही गोष्ट सांगितली. पण तिचे आई वडील रागावले त्यांनी हळूहळू बोलणे कमी केले. त्यांनी ठणकावून सांगितले, की आम्हाला जे करता आले नाही ते तू केले पाहिजे. आमचे स्वप्न तू पूर्ण कर. तिचे स्वप्न, तिचे स्वातंत्र्य रोज कोठेतरी दाबलं जात होत. अविनाश, मीनाक्षी सारखी कितीतरी मुलं व्यवस्थेच्या, घरच्यांच्या, शेजाऱ्यांच्या, नातलगांच्या दबावा खाली आपले आयुष्य कसे कसे ढकलत असतात. स्वतःची स्वप्न, स्वतःच्या आकांक्षा, रोज मारत जगत असतात. एक दिवस डोक्यावरून पाणी केले की स्वतःचा आयुष्य एका क्षणात संपून बसतात.
काही दिवसांपूर्वीच आयआयटी रुरकीच्या एका तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या करताना लिहिलेल्या चिठ्ठीतले शब्द होते, "अगर एक दुनिया से चला जायेगा तो कोई फर्क नहीं पडेगा." स्वतःला इतकं नगण्य मानून संपवू लागलेत लोक, याला आजूबाजूची जीवघेणी स्पर्धाच जबाबदार आहे. मी किती पैसे कमावतो पाहा, मी किती ठिकाणी फिरतो पाहा, मी किती सुखात जगतो पाहा, याचं सतत लोकांकडून व्हॅलिडेशन मिळवण्याचा रोग पसरत चाललाय. खरी गरज आहे ती आयुष्याची घडी विस्कटलेल्या माणसांच्या अस्तित्त्वाला इतरांनी व्हॅलिडेशन देण्याची. "तू प्रत्येक वेळी जिंकलंच पाहिजेस असं नाही, तुझं फक्त 'असणं' आमच्यासाठी गरजेचं आहे", हा विश्वास देण्याची. अभ्यास करूनही कुणी एखाद्या विषयात नापास होतो. प्रेम असूनही नाही समोरची व्यक्ती ते समजून घेऊ शकत. कष्ट करूनही सुटते एखादी नोकरी. रिस्क घेऊन सुरू केलेल्या स्टार्टअपमध्ये मिळतं कधीतरी अपयश. जीव ओतून बनवलेल्या फिल्मला नाही मिळत कधीतरी जितके मिळायला हवे तितके मानसन्मान. सकस लिखाणाला कधीतरी नाही मिळत अपेक्षेइतकं मानधन. पण या सगळ्या गोष्टींनी फरक नाही पडत आयुष्यात इतका जितका एका बेभान क्षणी आयुष्यच संपवण्याच्या निर्णयाने पडतो.
मुलं लहानपणी रेंगाळायला लागली की लगेच त्याचे आई-वडील त्याच्या LKG- UKG चा ध्यास घेतात. इंग्लिश मीडियमला टाकून त्यांना चार पाहुण्या-राहुळ्यात इंग्लिश बोलायला लावतात. मी असे काही इंग्लिश मीडियमचे मुले पाहिली त्यांना इंग्लिश तोडक मोडकी येते पण मराठी येतच नाही. कुठेतरी ते मुलं आपल्या संस्कृतीशी पण नाळ तोडत असतात. त्यांची स्वप्न लगेच आई-वडील ठरवून टाकतात. 3 इडियट मध्ये व्हायरस त्याच्या मुलाच भवितव्य दवाखान्यातच ठरवून टाकतो. ' हमारा बेटा इंजिनियर बनेगा ' अरे त्याला घरी घेऊन तर जा. त्याला बालपण तर जगु दे.. जीवघेण्या स्पर्धेत लहान मुलांचे बालपण सुद्धा दबले जाते. खेळायच्या वयात मुल एक्स्ट्रा ची धडे घेत असतात. आई वडील रोज घोकंपट्टीचे पाठ घेतात. गावाकडे तर डॉक्टर, इंजिनिअर सोडून दुसरे काही या जगात अस्तित्वात नाहीच असा अर्विर्भाव आहे. गाव या इंग्लिश मीडियमच्या जाचापासून वाचले होते पण हे रसायन आता गावात पण गेलं. त्यासाठी जिल्हा परिषदेचे शाळा सुद्धा जबाबदार आहे. त्यांचा दर्जा त्यांनी सुधारायला पाहिजे.
सचिन तेंडुलकर, मानव कौल, पंकज त्रिपाठी, अमिताभ बच्चन, मनोज वाजपेयी, मीराबाई चानु, अभिनव बिंद्रा, नीरज चोप्रा यांच्या आई-वडिलांनी जर त्यांना त्यांच्या स्वप्नांप्रमाणे जगून दिलं नसते तर कुठे ना कुठे ऑलम्पिक मधल्या मेडलला, एखादया फिल्मफेअर अवॉर्डला, वर्ल्ड कपला देश मुकला असता. प्रत्येक मुल काहीतरी वेगळी गोष्ट घेऊन जगात येतो. कुणी गणितात हुशार नसेल तर संगीतात असेल, कोणाचा विज्ञान जमत नसेल तर तो इतिहासाच्या सनावळ्या खडानखडा पाठ करत असेल, कोणी भूगोलात कच्चा असेल तर तोच फुटबॉल चांगला खेळत असेल.त्यांच्या कलांना वाव द्या. त्यांना हवं ते करू द्या, त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करू द्या. कोण म्हणतं डॉक्टर, इंजिनिअर आनंदी असतात. काही काही डॉक्टर रात्री बारा वाजता जेवतात, काही इंजिनिअरच आयुष्य ९-५ मध्ये जातं.पोलीस, कलेक्टर कामाच्या दबावाखाली जगणं विसरून जातात.
जेव्हा आवडीचं काम आपण करतो तेव्हा काम-काम राहत नाही. कधी मुलांना जवळ घेऊन विचारा तुला काय करायचं, तुला कशात आनंद मिळतो. आपली स्वप्न त्यांच्यावर लादु नका. कोणी चांगला कलाकार होईल तर कोणी चांगला अभिनेता तर कोणी चांगला खेलाडू तर कोणी चांगला लेखक, कोणी चांगला राजकारणी तर कोणी चांगला नागरिक बनेल. प्रत्येक मूल उमलत फूल असते त्याला उमलू दया. उमलयच्या आधी त्याला तोडायचा अट्टाहास सोडा. प्रत्येकाच यश त्याच्यातच मोजायला हव की तो/ती आयुष्यात किती आनंदी आहे. मुलांना योग्यवयात रणबिर कपूरचा ' तमाशा ' चित्रपट जरूर दाखवा.
एक सत्य घटना...
सोलापुरच्या करमाळा गावचा वडार समाजाचा मुलगा ज्याला ७वीच्या आतच दारू प्यायची सवय लागली नंतर गांजा,बिड्या ओढणे ,अश्लील चित्रपट पाहणे पुर्णतः वाया गेलेला...
७ वीत असताना ६ वी तील एक मुलगी आवडायला लागली त्याचा नालायकपणा मूलीला कळेल म्हणुन घाबरू लागला विचार बदलू लागले...१०वी नापास झाला. रिकामा वेळच वेळ वाचनाचा नाद लागला मिळेल ते पुस्तक कोणा एकाकडुन मृत्युंजय हाती लागलं त्याच्या कडुन कळालं अशी पुस्तके लायब्ररीत मिळतात. तेव्हा गावची लायब्ररी गाठली. सगळी पुस्तके वाचुन काढली. विचारांचा वेग वाढला. स्वतः ची तुलना सुरू झाली.अगदी रामायण महाभारतातल्या राक्षसापर्यंत बदलाची गरज तीव्रतेने जाणवू लागली...
शिक्षण सुरु झाले. पोलीस भरतीस प्रयत्न. शिवसेनेत प्रवेश. अनेक दंगलीत सहभाग. पुन्हा वैचारिक बदल. M.A मराठी साहित्य पुर्ण. पुढे Communication Studies ची Master Degree पुर्ण...कविता लिहू लागला. एक शाँर्ट फिल्म बनवली नंतर सिनेमा बनवला. दिग्दर्शक बनला. अजुनही प्रवास सूरूच आहे... ६१ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा प्रवास नेहमीच प्रेरणा आणि बळ देतो. भविष्यात कुणीतरी मोठं माणुस बनण्यासाठी आपलाही भूतकाळ असाच असावा असे अपेक्षीत नाही. लहानपणी कसे होतो यावरून भविष्याचा अंदाज बांधु नका, बदलाला वाव दिला पाहिजे माणुस कधीही बदलू शकतो फक्त स्वतः वरच्या विश्वासाला जिवंत ठेवलं पाहिजे... हे एकच उदाहरण नाहीय असे कितीतरी आहेत. प्रत्येकाकडे काहीतरी वेगळे असते त्या गोष्टीला शोधा आणि त्याचा पाठलाग करा..
आकाश अर्जुन दहे.
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली