खरी गरज आहे ती आयुष्याची घडी विस्कटलेल्या माणसांच्या अस्तित्त्वाला इतरांनी व्हॅलिडेशन देण्याची. "तू प्रत्येक वेळी जिंकलंच पाहिजेस असं नाही, तुझं फक्त 'असणं' आमच्यासाठी गरजेचं आहे", हा विश्वास देण्याची. अभ्यास करूनही कुणी एखाद्या विषयात नापास होतो. प्रेम असूनही नाही समोरची व्यक्ती ते समजून घेऊ शकत. कष्ट करूनही सुटते एखादी नोकरी. रिस्क घेऊन सुरू केलेल्या स्टार्टअपमध्ये मिळतं कधीतरी अपयश. जीव ओतून बनवलेल्या फिल्मला नाही मिळत कधीतरी जितके मिळायला हवे तितके मानसन्मान. सकस लिखाणाला कधीतरी नाही मिळत अपेक्षेइतकं मानधन. पण या सगळ्या गोष्टींनी फरक नाही पडत आयुष्यात इतका जितका एका बेभान क्षणी आयुष्यच संपवण्याच्या निर्णयाने पडतो. म्हणून एकच सांगणं आहे मित्रांना. एकवेळ राजकारण, ट्रोलिंग, मिम्स या सगळ्या पोस्ट्सनी वॉल नाही भरलीत तरी चालेल, पण मनाचं दुखणं मनावर घ्या आणि मदतीचा हात मागायला पुढे या.
आकाश दहे..