पुण्याचा ' मानाचा ' गणेशउस्तव

0


पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये गणेशोत्सवाच अनंत साधारण महत्व आहे.पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी  देशभरातून लोक दरवर्षी येतात. गणेशोत्सवाच्या पुण्यातील संस्कृतीबद्दल आज आपण प्रकाश टाकणार आहोत.

देशभरात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी पुणे येथूनच 1893 सालापासून सुरु केला,आणि हि परंपरा आजही सातत्याने सुरु आहे. पुण्यात फार पूर्वीपासून काही गणपतींना विशेष मान होता आणि आजही आहे.
मध्ययुगात संपूर्ण हिंदूस्थानात ज्या मराठी सत्तेचा दबदबा होता, त्याचे प्रमुख कारभारी पेशवे. त्यांचं आराध्यदैवत गणपती.पेशवे अर्थातच पुणे. त्यामुळे पेशवाईच्या काळातच पुण्यात शनिवारवाड्यात गणपती उत्सव साजरा होत होता.पुढे मग सवाई माधवराव पेशव्यांनी या उत्सवाला मोठे रूप दिले. जे नंतरच्या काळात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य स्थापनेच्या कामात आणखी व्यापक केले ते आजतागायत सुरू आहे.

मानाच्या गणपतींचा थोडक्यात इतिहास-:

पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती


कसबा पेठ (स्थापना-:१८९३)
आपल्याकडील परंपरेनुसार, प्रत्येक गावाचे एक ग्रामदैवत असते तसेच ते पुण्याचेही आहे. कसबापेठेचा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. त्यामुळे याचा मान पहिला. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची लहान होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत.  या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. 
मानाचा गणपती असुनही दरवर्षी अतिशय पारंपरिक पद्धतीने आणि कोणताही डामडौल, गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्यात या मंडळाचा हातखंडा आहे. साधी पण नेमकी आणि नीट नेटकी सजावट हे देखील याचं खास वैशिष्ट्य.
                                          कसबा गणपती

तांबडी जोगेश्वरी(स्थापना-:१८९३)
श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. अप्पा बळवंत चौकात तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या लगतच या मूर्तीची स्थापना होते. हे देऊळ मूळचे दुर्गादेवीचे असून ते पंधराव्या शतकात बांधले असल्याचे ऐतिहासिक पुरावे सांगतात.
इथं दुर्गादेवीची अत्यंत सुंदर मूर्ती आहे, जी स्वयंभू असून तिला ग्रामदेवीचा मान आहे. सोबतच गणपतीची मूर्ती आहे.कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. 

                                  तांबडी जोगेश्वरी गणपती


गुरुजी तालीम मंडळ(स्थापना-:1887)
गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. 

                                   गुरुजी तालीम गणपती


श्री तुळशीबाग गणपती(स्थापना-:1900)
पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. प्रसिद्ध अशा तुळशीबागेच्या मध्य चौकात या मूर्तीची स्थापना करण्यात येते. दीक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या ठिकाणी मूर्ती स्थापन करुन उत्सवाची सुरुवात केली.
१३ फूट उंचीची ही मूर्ती  हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. 

                                  तुळशीबाग गणपती

श्री. केसरीवाडा गणपती(स्थापना-:१८९४)
पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. नारायण पेठेतील केसरी वाड्यात या मूर्तीची स्थापना करण्यात येते.केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. .

                                 केसरीवाडा गणपती

पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला देखील इतिहास आहे.
पुण्यातील मानाच्या गणपतींचा क्रम कोणी आणि कधी ठरवला?असा प्रश्न अनेकांना पडला असेल.  जाणून घेऊयात पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा इतिहास...

1893 मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्याच्या दुसऱ्याचं वर्षी म्हणजेच 1894 मध्ये आधी कोणत्या मंडळाच्या गणपतीचं विसर्जन आधी करायचं? यावरुन वाद निर्माण झाला होता. लोकमान्य टिळकांपर्यंत हा वाद पोहचला आणि टिळकांनी मानाच्या गणपतींचा आणि विसर्जनाचा क्रम लावून दिला. पुण्याचा ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचं विसर्जन सर्वात आधी होईल, असं टिळकांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुण्याची ग्रामदैवता असलेल्या तांबडी जोगेश्नवरी मंडळाचं विसर्जन होईल. या दोन्ही मंडळांचे विसर्जन झाल्यानंतर इतर मंडळाचे विसर्जन केले जाईल, असं टिळकांनी सांगितलं होतं. आज देखील टिळकांनी घालून दिलेल्या क्रमानेच विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.


ओमकार शेलार..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top