दोन दशकांपूर्वी जेव्हा पुर्ण गुजरात मधे धर्माच्या नावावर दंगली घडत होत्या, लोकं एकमेकांवर अमानुषतिने हल्ले करत होते त्याच वेळेस दाहूड जिल्ह्यात लिमखेडा शहरात बिल्कस बानो नावाच्या महिलेवर कोणत्याही महिलेवर होऊ नये अशा प्रकारचा अत्याचार झाला. डोळ्यांसमोर पोटच्या मुलीचाही जीव नराधमांनी घेतला त्याच नराधमांनी बिल्किसच्या कुटुंबातील 14 जणांची हत्या केली.
योगायोग असा की पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट च्या दिवशी महिला सशक्तिकरण, 'महिलांना अपमानित करण्याच्या संस्कृतीचा आपण त्याग केला पाहिजे' असे प्रतिपादन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी लाल किल्ल्यावरून पूर्ण देशाला संबोधित करताना केले. त्याच दिवशी त्यांच्याच राज्याच्या प्रशासनाने या 11 जणांना बिल्कीस प्रकरणातून मुक्त केले. अजूनही देशात विशिष्ट धर्म, जाती ह्या लोकांसाठी वेगळे कायदे आणि इतर समाजाला वेगळे. बिल्कीस च बिल्कीस बानो असणं महाग पडलं. सरकारे, न्यायालय, गुन्ह्याच गांभीर्य का लक्षात घेत नाही? एक नव्हे दोन नव्हे तर 14 जणांचा बळी त्यात गेला व बिल्कीसच्या छोट्या मुलीचाही यात मृत्यु झाला, एवढं भयावह कृत्य असूनही नराधमांना सामूहिक माफी कितपत योग्य? कधी हाथरस मध्ये रात्रीच बलात्कारी पिडीतेचा अंतिम संस्कार घरच्यांच्या परवानगी विना केला जातो, तर आता बिल्कीस बानो प्रकरण.
देशात रोज कितीतरी बलात्कार होता, कित्येक नोंदवले जातात तर कित्येक समाजाच्या दबावामुळे पुढे येत नाही. न्यायव्यवस्था, पोलीस व्यवस्था जर काही लोकांच्या हातातले बाहुले बनत असेल तर जे थोडे फार बलात्कार नोंदवले जातात ते नोंदवणे सुद्धा बंद होईल. नेत्यांना सुद्धा थोडी समज येऊन फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कित्येक पीडित लोकांना उघड्यावर आणण्याचा प्रकार अजून किती दिवस करणार आहेत?
मागच्या आठवड्यात राजस्थान मध्ये दलित मुलाने (इंद्रकुमार मेघवाल) शिक्षकांच्या माठातले पाणी पिल्यामुळे त्याला शिक्षकाने बेदम मार दिला. तो मुलगा आज आपल्यात नाही. याची जबाबदारी कोण घेणार? एकविसव्या शतकात आपान आहोत, यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करतोय लाल किल्ल्यावर मोठ मोठ्या घोषणा होत आहे, हर घर तिरंगा होतोय पण एक समाज म्हणून आपण कुठे चाललोय? जातींमुळे समाज पुरता पोखरलाय. जर प्रशासन सुद्धा जातींच्या लेन्स मधूनच न्यायनिवाडा करायला लागला तर या समाजाचा थोडा थीडका विश्वास प्रशासनावर आहे तो सुद्धा गमावून बसू. विश्वगुरू बनण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत पण मूलभूत न्याय समानता आपण तळागाळातल्या लोकांना देऊ शकत नाही, तर कसे विश्वगुरु आपण बनणार आहोत.
अमेरिकेत जॉर्ज फ्लोयेड नावाच्या कृष्णवर्णीय माणसाचा पोलिसांकडून मृत्यू झाला तेव्हा आपल्याकडील चित्रपट सृष्टीतील दिग्गज, क्रिकेट कला, साहित्यातील दिग्गज सगळे ओसंडून पुढे आले पण राजस्थान मधील दलित मुलाचा फक्त तो दलीत असल्याने मृत्यू झाला व गुजरात मधील बिल्कीस प्रकरण ह्या वेळी हे लोकांनी काडीचाही आवाज नाही केला नुसता शुकशुकाट. आपल्याकडे लोकांनी हे सगळं एक नॉर्मल म्हणून घेतला आहे. त्या शिक्षकाच्या बचावासाठी कित्येक लोक राजस्थानमधील रस्त्यांवर उतरले. समाज म्हणून हाच आपला कळस.
बिल्कीस तिच्या दुसऱ्या मुलीला वकील बनवण्याची स्वप्न ऊराशी बाळगून होती कारण पीडितांचा आवाज न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचवा असा तिचा उद्देश. पण या निर्णयामुळे तिच्या मनाला काय वाटले असेल याचा विचार न केलेला बरा. बाहेर आल्यावर त्याच नराधमांनी जशी एखादी जंग जिंकून आणली असे स्वागत झाले, त्यांना पेढे, हार घालण्यात आले. महिलांचा विकास झाला पाहिजे, अपमान करणाऱ्या संस्कृतीचा त्याग केला पाहिजे असे जर पंतप्रधानांना वाटत असेल तर प्रत्येक महिलेला न्याय मिळाला पाहिजे ती कोणत्याही जातीची, वर्णाची, पंथाची किंवा धर्माची का असेना सुरुवात त्यांच्या राज्यातून करावी.
- आकाश अर्जुन दहे