झेंड्यातच राहिलो आम्ही
गुरफटून अगदी तंतोतंत
वाटलीच नाही आम्हांला
आमच्या प्रगतीची खंत.
झेंडा मिरवत गेलो आम्ही
न बघता कुणाचा पक्ष
स्वतःहून झालो मग आनंदात
या जातिवाद्यांचे भक्ष्य.
हजार पाचशेसाठी आम्ही
केली नाही मताची किंमत
आता आमच्या दुःखाची
घेतात मग सारेच गंमत
झेंडा आणि बॅनरबाजी
याला दिला भरपूर वाव
पुढाऱ्यांसाठी आम्ही
घेतली चोहीकडे मग धाव
स्वाभिमान आमच्यातला
टाकला आम्ही सारा विकून
म्हणून आज नोकरी नाही
दर्जेदार आम्ही शिकून
झेंड्यातच राहिलो आम्ही
ओळख स्वतःची विसरून सारी
आता स्वतःच्या हक्कासाठी
फिरतो आहोत दारोदारी
कवी: गणेश रामदास निकम सर