#जागतिक_जैवविविधता_दिन
आपण एकीकडे जंगलांना देशाचे धरोवर म्हणतो.मात्र दुसरीकडे जैवविविधतेने नटलेल्या त्याच जंगलांचा व त्यातील जैवविविधतेचा आपण मानवी हस्तक्षेप करून ऱ्हास करत आहोत हीच खेदाची व दुःखाची बाब आहे.
जंगल हे फक्त वन्य प्राण्यांचे घर आणि वन्य जीवन नाही तर देशाचे ते धरोवर आहे हेच लोक का लक्षात घेत नाही? हाच मोठा प्रश्न आहे.आणि वाढते तापमान, किंवा बदलते हवामान यावर पण काय परिणाम होतो याचेही चिंतन करायची वेळ आहे.
जंगलात अनेक प्रकारचे जीव, झाडे, पशु-पक्षी अधिवास करतात. दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात.रानभाज्या , किटक फुलपाखरे ,विविध प्रकारची झाड ,झुडपं,त्यावर अवलंबून असणारे कीटक, प्राणी वेगवेगळी गवत हे सर्व इथे एकत्रपणे राहतात आणि वाढतात.जंगलावर आधारित अशी परिसंस्था येथे अधिवास करत असते. पण या शांततेला कधी कधी वणवा लागतो नाही तर तो लावलाच जातो .अलीकडच्या काळात माझ्या परिसरातील प्रत्येक जंगलात वणवा प्रकर्षाने जाणवतो.आता तर माझ्या तालुक्यात जंगलांमध्ये वणवा पेटणे ही नेहमीची बाब झाली आहे.
मला आठवतंय मी लहान असताना घरापासून सायंकाळी घराच्या अंगणात बसलो की डोंगराला आग लागलेली दिसायची.तेव्हा आजीला विचारलं की आजी सांगायची ते जे पट्टे दिसतात न त्याला जाळपट्टे असे म्हणतात. जंगलाला वणवा लागू नये जर लागला तर तो सम्पूर्ण जंगलात पसरु नये म्हणून असे जाळपट्टे वनविभागाची माणसं करतात. तरीही कधी कधी संपूर्ण डोंगर पेटताना दिसायचा तेव्हा कोणी उरलेली विडी, सिगारेट टाकली असेल म्हणून पेटले असेल जंगल असे आजी सांगत .
मी मात्र साधारण 2016 पासून मार्च महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत कुठल्यातरी जंगलाला सहज वणवा लागलेला बघते .एखाद्या वेळेस वणवा हा तीव्र उष्णतेने लागू शकतो. सुकलेल्या पाल्या-पाचोळ्यावर जेव्हा तीव्र सूर्य किरण पडते तेव्हा ज्वलन प्रक्रियेने आग लागू शकते. ही आग हळूहळू पसरते आणि मग वाऱ्यामुळे विशाल रूप धारण करते. कधी तर या आगीचे रूप खूप भयानक असते आणि आग आटोक्यात आणताना वन विभागाची दमछाक उडते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे कोणाचा यावर ताबा राहत नाही किंवा ताबा ठेवता येत नाही.म्हणून यावर माझ्याच परिसरात काढलेला तोडगा मला आजही आठवतो.असेच एकदा हरिश्चंद्र गड रोडने जीप मधून प्रवास करत असताना जीप एका स्टॉप वर थांबली तिथे बाजूला डोंगर होता तर त्याचे गवत असे पट्टे पट्टे कापल्यासारखे लांबून दिसले. मी जीप मध्ये बसलेल्या काकांना विचारले या डोंगरावर असे पट्टे पट्टे करून गवत कापल्यासारखे का दिसत आहे. तर ते बोलले की पूर्वी फॉरेस्टची माणसं जाळपट्टे करत मात्र आता जाळपट्टे ऐवजी डायरेक्ट गवताला तणनाशकचा फवारा मारतात . वणव्यापेक्षाही भयानक वाटलं हे. जर गवत लहान असतानाच गवत मारून टाकलं किंवा अशी जंगल जाळून टाकली तर गवत राहील कसे व बियाणेजळून गेले तर गवत येईल कोठुन ,हळूहळू कालांतराने ही सर्व जैवविविधता नष्ट झाली तर काय करणार ? असे प्रश्न या प्रवासात केले होते मात्र ते काका एवढेच म्हटले सगळं कळतं पण कोण ऐकणार !😢
आजकाल सर्वत्र बऱ्याचदा वणवा मानवाच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे दिसायला लागला आहे.या वणव्यामुळे वनस्पती, पशु पक्षी, कीटक, गवत, सर्व जैवविविधता नष्ट होत आहे. फिल्डवर काम करत असताना तेथील माणसांसोबत चर्चा व्हायच्या प्रामुख्याने काही लोकं नवीन चांगले गवत उगवावे म्हणून सुकलेले वाळलेले गवताचा भाग पेटवतात. वाळलेला पालापाचोळा पेटवतात. तसेच ज्यांच्या जमिनी डोंगराच्या पायथ्याशी किंवा जवळ आहेत तर गवताचे बी पावसाच्या पाण्याबरोबर शेतात वाहून येते व शेतात जास्त गवत होते यामुळे सुद्धा वणवा लागतो. मधाचे पोळे जाळताना आगीचा उपयोग केला जातो त्यातून पण वणवा लागतो असे बरीच कारणे समोर आली. या सर्वांवर उपाय फक्त जंगल पेटवणे हाच असू शकतो असे नाही.जर जंगल आणि जंगलावर आधारित जैवविविधता टिकवायची जपायची असेल तर सर्वांनी मिळून काहीतरी शाश्वत उपाययोजना केल्या पाहिजेत.त्यावर तोडगा काढण्यासाठी त्या त्या परिसरातील प्रत्येकाने जबाबदारीने एकत्र यायला हवं !🌱🍂🍃🌴🌾🌿☘️🍀🌳🌲🌷🌼🌺🐜🦂🦟🕸️🦋🕷️🦗🐞🦑🦀🐇
विजया पाडेकर✍️
भंडारदरा टुरिझम 🏕️
आपलं शिवार संस्था 🌱