राजकारणातील घराणेशाही

0

साधारण एक वर्ष झाले असेल सुशांत सिंगच्या मृत्यू नंतर चित्रपट सृष्टी मध्ये किती घराणेशाही आहे याचा आव आणत समाज माध्यमांमध्ये एकच कल्लोळ माजला होता. ते  ताळीबंदीचे दिवस होते लोकांना घरबसल्या काही कामे पण नव्हती त्यामुळे महिना-दोन महिने समाज माध्यमांवर पूर्ण धिंगाणा चालू होता जो तो उठलासुटला क्राईम ब्रँच ऑफिसर, वकील, डॉक्टर, जर्ज असे आपले व्यवसाय आहे मानून काहीही बरळून टाकायचा. जाऊद्या तो विषय वेगळा. पण देश ज्याच्यावर चालतो,घडतो,विकसित होतो असे राजकारण. राजकारणातील घराणेशाही वर कोणीही काही बोलत नाही किंवा बोलले नाही. भारताच्या वरच्या टोकापासून म्हणजे कश्मीर बसून तर खाली केरळपर्यंत घराणेशाही या आजाराने देशाला ग्रासले आहे. आता काही हुशार लोक याला युक्तिवाद देतील की त्यात काय वाईट आहे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, सैनिकाचा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सैनिक बनतो, व्यावसायिकाचा मुलगा पुढे जाऊन घरचा व्यवसाय चालवतो मग त्यात काय आश्चर्य आहे की राजकारण्याचा मुलगा बापाचा वारसा पुढे चालवतो? अरे दादा देश चालवणे म्हणजे काय घरचा धंदा चालण्यासारखं सोप्प आहे का? भारतासारख्या देशाच्या गाडा स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालवायला फक्त एखाद्या श्रीमंत घरी जन्माला येणे किंवा एखाद्या राजकारण्याच्या घरात जन्माला येणे एवढी पुष्कळ नाहीय.

नेहरू-गांधी परिवार जरी घराणेशाहीचे आद्य संशोधक असले जरी जो पक्ष असे म्हणतो की 'परिवार म्हणजे पार्टी नाही तर पार्टी हाच माझा परिवार आहे' अशा भाजपाला सुद्धा या रोगाने पछाडले आहे. भारतीय राजकारणाचा प्रवास लोकशाही नामक गोंडस नावाने चालला असला तरी राजकारणाच्या नाड्या काही मोजक्या कुटुंबांच्या हातातच आहे.

देशाच्या वरच्या टोकापासून म्हणजे जम्मू आणि कश्मीर पासून चालू केले तर अब्दुल्ला घराण्याची तिसरी पिढी जम्मू-काश्मीरला स्वतःची जहागीरदारी आहे असे मानून तेथे राज्य करत आहे. ओमर अब्दुल्लाचे आजोबा शेख अब्दुल्ला ज्याला शेरे-ए-कश्मीर म्हणायचे त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष काढला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांची व्यवस्था करुन गेला. तो जम्मू-काश्मीरचा मुख्यमंत्री झाला त्यानंतर फारुक अब्दुल्ला आणि आता ओमर अब्दुल्ला. त्याच काश्मीरच्या नंदनवनात अजून एक कुटुंब आपली सत्ता गाजवतो मुफ्ती. त्यांचा पक्ष पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी मुफ्ती मोहम्मद सईद या पक्षाचा पाया रचला होता आता त्याची मुलगी मेहबूबा मुफ्ती पक्ष चालवते.

जम्मू आणि कश्मीरच्या खाली पंजाबचा सुपीक प्रदेशात आले की माती बदलते पण मानसिकता नाही. पंजाब मध्ये बादल परिवाराची राजकारणावरील पकड मजबूत आहे. त्यांचा पक्ष शिरोमणी अकाली दल त्याचा निर्माता प्रकाश सिंग बादल. चार वेळा मुख्यमंत्री होऊन गेलेला. आता त्याचा मुलगा सुखबीर सिंग बादल पक्षाचा अध्यक्ष आहे. 2009 ते 2017 काळात पंजाबचा उपमुख्यमंत्री होऊन गेलेला. प्रकाशसिंगची सून हरसिमरत कौर बादल मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होती पण शेतकऱ्यांचे आंदोलनाचे पडसाद जेव्हा उमटले तिने राजीनामा दिला. सध्या पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग. त्यांची पत्नी तीन निवडणुकांपासून खासदारकीचे आंबे चाखत आहे.

पंजाबच्या शेजारील राज्य हरियाणा येथे चौटेला घराण्याचे वर्चस्व अगदी सुरुवातीपासून आहे. भारताचे 1989 ते 1991 मध्ये उपपंतप्रधान झालेले देवीलाल चौटेला यांच्या पुढील ओम प्रकाश चौटेला त्यानंतर आत्ता दुष्यंत चौटेला.

मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांत आपल्या घराणेशाहीचा पसारा मांडून बसलेले सिंधीया घराणे हे काही यात सुटले नाही. विजयाराजे सिंधिया भाजपच्या नेत्या होत्या त्यांच्या दोन मुली यशोधरा आणि वसुंधरा राजे. वसुंधरा राजे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री होत्या आता त्यांचा मुलगा दुष्यंत खासदार आहे. विजयाराजे यांचा मुलगा माधवराव शिंदे काँग्रेसमध्ये मोठे कद्दावर नेते होते. 2001 मध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य सिंधिया भाजपकडून राज्यसभेचा खासदार आहे.

देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश हेसुद्धा घराणेशाहीत कमी नाही. लोकसभेमध्ये 80 खासदार देण्याचे काम एकटे उत्तर प्रदेश करते त्यामुळे या राज्याचे महत्त्व खूप आहे. यादव घराणे यात अग्रेसर आहे. मुलायमसिंग यांनी समाजवादी पार्टी काढली आता त्यांच्या मुलाचे अखिलेशचे त्यावर वर्चस्व आहे. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री होऊन गेलेल्या अखिलेशची पत्नी डिंपल यादव लोकसभेमध्ये खासदार आहे.

यूपीच्या शेजारी बिहार तिथे पण यादवांचे वर्चस्व आहे. लालू यादव हे दिमाखदार भाषा, चारा घोटाळा यांच्यासाठी प्रसिद्ध असलेले तरीही सध्या जेलची हवा खाताय. लालूची पत्नी राबडीदेवी सुद्धा बिहारची मुख्यमंत्री होऊन गेलली आहे. सध्या त्यांचा मुलगा तेजस्वी यादव बिहारचा विरोधी पक्ष नेता म्हणून कार्यरत आहे. बिहारमध्ये पासवान घराण्याची दुसरी पिढी सुद्धा राजकारणात ठाण मांडून पुढे आली आहे. रामविलास पासवान नंतर आता त्यांचा मुलगा चिराग पासवान चित्रपटसृष्टीत अपयशी झाल्यावर राजकारणात यशस्वी होण्याची स्वप्न बाळगून आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममताची जागा भाचा अभिजित घेणार याच्यवर आता शिक्कामोर्तब झाला आहे आणि आसाममध्ये काँग्रेसच्या तरुण गोगईची जागा त्यांच्या मुलाने गौरव गोगईने घेऊन काँग्रेसमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. ओडिसामध्ये पटनाईक घराण्याचे वर्चस्व दिसून येते तसेच दक्षिणेकडे तामिळनाडूत करुणानिधीची दुसरी पिढी स्टॅलिन. सध्या तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेला आहे.

कर्नाटक मध्ये माजी पंतप्रधान एचडी देवगोंडा यांची जनता दल सेक्युलर त्यांचा मुलगा एचडी कुमारस्वामी कर्नाटकचा मुख्यमंत्री आणि दुसरा मुलगा एचडी रेवाना मंत्री होऊन गेला.
                                   Source: India Today

आंध्रामध्ये एन टी रमा राव ने 1982 मध्ये तेलगू देसम पार्टी काढली त्याच्या जावयाने चंद्रबाबू नायडू ने घरातल्या घरात तक्तापलट करून तेलगू देसम पार्टीचा सर्वेसर्वा झाला. त्यानंतर आंध्राचा मुख्यमंत्री.
आंध्राचे माजी मुख्यमंत्री राजेश्‍वर रेड्डी 2009 मध्ये विमान अपघातात गेले. त्यांची जागा YS जगनमोहनने घेऊन 2011 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन वायएसआर काँग्रेस नवीन पक्ष काढला आणि आत्ता आंध्राचा मुख्यमंत्री झाला.

या सर्व उन्मादाला केरळाचा कम्युनिस्ट पक्ष सुद्धा मागे राहिला नाही त्यामध्ये आता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पिनाराई विजयानने आपल्या जावयाला मंत्रिमंडळामध्ये मंत्री करून कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा घराणेशाही मध्ये सामील करून घेतले.

आता आपला महाराष्ट्र. इथे तर पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असे काही करून ठेवले आहे.
विश्वजीत कदम, राजीव सातव, निलेश राणे, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते, पुनम महाजन, पंकजा मुंडे, हिना गावित, अजून किती तरी अशी उमेदवार आहे ज्यांचे राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे ठाकरे, पवार, पाटील, चव्हाण, मोहिते अशा मोजक्या कुटुंबाभोवती फिरते. महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था, सहकारी कारखाने, दूध डेरी काढून आपल्या प्रदेशातील राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे काम या राजकारण्यांनी केले.
ज्याच्याकडे सहकारी साखर कारखाना आहे तो तो आपआपल्या तालुक्याचा आमदार म्हणून हमखास निवडून येणार हे ठरलेलं गणित. ज्यांनी लोकांच्या  दहाव्या पासून तर लग्न पर्यंतच्या कार्यक्रमांना हजेरी लावली अशांना आपण डोक्यावर घेऊन नाचवलं.

१९९२ साली शिवसेनेच्या संस्थापक सदस्यांपकी एक असलेले माधवराव देशपांडे यांनी उद्धव आणि राज यांच्या शिवसेनेतील राजकीय प्रवेशाला आक्षेप घेतला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’तून अग्रलेख लिहून त्यांच्यावर कडवी टीका केली होती. त्यात बाळासाहेब म्हणतात, ‘‘शिवसेनेला २६ वष्रे पूर्ण होऊन २७ वे सुरू आहे. या काळात आम्ही काय सोसले आणि काय काय भोगले, याची कल्पना नसलेल्या कुतरडय़ांचा सध्या सुळसुळाट होऊ लागला आहे. रोज सकाळ-संध्याकाळ आमच्या घराणेशाहीवर आरोप करून भुंकत असतात. आम्ही नातेवाईकांची कुठेही वर्णी लावली नाही. पुत्र-पुतण्यास भविष्यात शिवसेनेचे सर्वेसर्वा करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. कुणी कुणाचे भविष्य घडवत नसतो. ज्याच्या त्याच्या रक्तात कर्तृत्व नावाचे गुण असतात, ती माणसे आपणहून उभी राहतात. त्यांना कसल्याच आधाराची गरज नाही, हा इतिहास आहे. उद्या जर उद्धव आणि राज स्वत:च्या कर्तृत्वावर उभे राहिले, तर मलाही रोखता येणार नाही. परंतु शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. शिवसेना एक कुटुंब आहे. आम्ही शिवसनिकांवर पुत्रवत प्रेम केले.’’ परंतु पुढे याच बाळासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या मुलाखतीत ‘उद्धव व आदित्यला सांभाळा,’ असे आर्जवही केले. म्हणजेच काय, तर ‘आम्ही नातेवाईकांची वर्णी लावणार नाही’ असे सांगत बाळासाहेबांनीही शेवटी घराणेशाहीचाच कित्ता गिरवला. 

आता भाजपा हा पक्ष पार्टी विथ डीफरन्स होता त्याला सुद्धा या घराणेशाहीच्या रोगाने पछाडले आहे. आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरपंत फडणवीस विधान परिषदेमध्ये सदस्य होते तर फडणवीस यांची काकी शोभा फडणवीस राज्यामध्ये मंत्री होती. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही मुली एक खासदार झाली तर एक आमदार ( पंकजा मुंडे आमदार होती). दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन लोकसभेवर खासदार आहे. राजनाथ सिंगचा मुलगा पंकज सिंग उत्तर प्रदेशमध्ये आमदार आहे. आणि अमित शहाच्या मुलाचे ताबडतोब बीसीसीआयच्या सचिव पदी वर्णी ही सुद्धा घराणेशाहीची एक बाजू आहे. भाजपचे सुद्धा आता काँग्रेसीकरण होऊ लागले आहे.

राजकीय घराण्यांच्या सत्तेतील चौफेर वर्चस्वामुळे सामाजिक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. घराण्यांच्या प्राबल्यामुळे नवीन नेतृत्व घडण्यात एक प्रकारे शिथिलता आली आहे. देशाच्या राजकारणातील पुढील नेतृत्व हे शेतकऱ्यांच्या बांधावरून, मजुराच्या घरातून, मच्छिमाराच्या झोपडीतून, मेंढपाळाच्या झापातून संसदेत गेले पाहिजे आणि आपल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे हीच आशा.

जब जब सत्यवती ने वचन मांगा 
देवृत्त के अधिकार त्याग पर,
जब जब कुरु वंश पर संकट आया 
भीष्म पर नेतृत्व का भार आया.
धर्म की रक्षा में जीवन खर्चा पर 
हर जीत में होती युवराज की ही चर्चा
राजघरों ने तो सक्षम को 
तब भी धिक्कारा था 
सत्यवती के प्रेम में सिंहासन
 तब भी हारा था.
तुम पूछो कलयुग में 
द्वापर का प्रसंग क्या है 
मैं कहूँ हस्तिनापुर से 
अकबर रोड तक बदला ही क्या है?

आकाश अर्जुन दहे.
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top