'आनंद' नुसता शब्द जरी ऐकला तरी मनाला किती बरं वाटतं ना,खरंच प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यात दुःख नसावं तर आनंदाचे वास्तव्य असावं,पण हा आनंद नेमका मिळवायचा कसा असा प्रश्नही निश्चित सर्वांसमोर उभा राहतोच,सध्याचे आपले जीवन खूप धकाधकीचे आहे आपल्याला सतत तणाव जाणवतो, काही सुख नाही आणि सुख नाही म्हणून जगण्याचा आनंद मिळत नाही असे वारंवार सर्रासपणे जिकडे तिकडे ऐकायला मिळते, पण हे असे का होते याचा विचार मात्र कोणाला करायचा नसतो,कारण त्याला वेळ कोणाकडे आहे.
एकवेळ होती की लोकांना आनंद मिळवण्यासाठी धडपड नव्हती करावी लागत,तो त्यांना सहज मिळत होता,निर्माण करायची कोणती गरज भासत न्हवती,कारण आनंद हा त्यांच्याकडून जाणूनबुजून निर्माण केला जात न्हवता, तर तो छोट्या छोट्या गोष्टींमधून निर्माण होत होता,परंतु आज परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे आनंद सहज मिळत नाही तर तो निर्माण करण्यासाठी माणसांना वेगळी धडपड करावी लागते.
पूर्वी लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधानी होत होती,आपल्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे पहायची आणि त्यात समाधान मानून घ्यायची,इतरांकडे आपल्यापेक्षा काय जास्त आहे आणि ते आपल्याला का नाही मिळत यासाठी दुःख धरून न्हवती बसत,उलट आपल्याकडे जे आहे तेही कितीतरी जणांना सहज मिळत नाही म्हणून खुश होत होती,कोणत्याही गोष्टीची अधिकची हाव न्हवती म्हणून त्यांना त्यागोष्टीमध्ये दडलेला आनंद सापडायचा.
"छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
मोठा आनंद शोधला की
आयुष्य सोप्पे आणि सुखकर होते"
याचा अर्थ खूप चांगल्या रितीने समजायचा लोकांना,त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या छोट्या गोष्टींमध्ये देखील खूप मोठा आनंद त्यांना मिळायचा,खेळातून प्रत्येकाला आनंद मिळतो असे म्हणतात आणि ते खरंच आहे,पूर्वी व्हिडीओ गेम न्हवते, पण तरी चाकाला काठीने धक्का मारत गोल गोल घुमवणे, झोके घेणे,लगोरी खेळणे,लपाछपी खेळणे यातून जो फुकटचा आनंद मिळायचा,तो आताच्या विकत घेतलेल्या महागड्या गेममधून कसा मिळेल,एकटे बसून खेळणे आणि सवंगड्यांच्या सान्निध्यात खेळणे यात खूप मोठे अंतर आहे.
उन्हातान्हात हिंडत खेळणे,मित्रांशी गप्पा मारणे,त्यांच्याशी मस्ती करणे,यात खूप मोठा आनंद दडलेला होता जो कोणतेही मूल्य न चुकवता मिळायचा,आता मात्र तोच आनंद आपल्याला ऑनलाइन गप्पांच्या माध्यमातून घ्यावा लागतो,परंतु त्यातून खरा आनंद मिळतो का? हा तर विकतचा घेतलेला आहे म्हणजे आता मित्रांशी बोलायला देखील आपल्याला पैसा मोजावा लागतो,तेव्हा जाऊन कुठे तर आपल्याला बोलता येते,पण अगोदर मात्र असे न्हवते कधी ही भेटायचे बोलायचे एकमेकांना स्पर्श करायचे,प्रेमाने गोंजरायचे हे सगळं होत असे ज्यातून एक वेगळाच आनंद मिळायचा,जो आताच्या या ऑनलाइन गप्पांमधून कुठे मिळणार जो इतका महाग आहे त्यासाठी आपल्याला पैसे जे मोजावे लागतात.
खाण्यापिण्याच्या गोष्टींमधून जो आनंद मिळायचा तो तर काही वेगळाच होता,आईने प्रेमाने बनवून भरवलेला भाकरीचा घास त्यातून खूप मोठा आनंद मिळायचा,पण तोच आनंद आता विकतच्या पिझ्झा मधून लोक घेतात पण त्या भाकरीची आणि या पिझ्झा याची तुलना होऊच शकत नाही कारण तो भाकरीचा आनंद फुकटचा होता,आणि हा विकत घेतलेला आनंद.
आता लोक तणावमुक्त होण्यासाठी म्हणुन पिकनिक स्पॉट ठरवून बाहेर फिरायला जातात,मुलांना सुट्ट्यांचा आनंद देण्यासाठी धडपड करतात तरी देखील ते मुलांना खरा आनंद देऊच शकत नाही कारण एखाद्या महागड्या हॉटेल किंवा रिसॉर्ट वर जायचे,पैसे वाया घालवायचे आणि दिवसभर रूमवर लोळत रहायचे यातून तो आनंद घेता येत नाही जो,चिंचा,कैऱ्या,असे वेगवेगळे जिन्नस गोळा करायचे एकत्र बसून एकमेकांना प्रेमाने भरावयाचे,मस्ती करायची,यातून गोळा करता येत होता.
पूर्वी लोक सहज आनंद मिळवत होते आणि तो कोणत्याही गोष्टींमधून मिळायचा परंतु आता कोणत्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो तर जो आपण ठरवतो की त्यातून आपल्याला आनंद मिळणार आहे,मग भले त्या आनंदाला मिळवण्यासाठी आपल्याला किती का त्रास होईना,भले मिळेलही तो आनंद पण तो फुकटचा मुळीच नसणार त्यासाठी आपल्याला काही ना काही किंमत मोजावी लागणारच.
माणसाच्या आयुष्यात शिक्षणाला खूप महत्त्व आहे आणि त्या शिक्षणातून प्रत्येकाला काही ना काही मिळत असते आणि हे शिक्षण घेताना एक वेगळाच आत्मिक आनंद मिळतो आणि हा आनंद खरतर पूर्वी खप मिळायचा,शाळेत जायचं, खेळायचं ,मधल्या सुट्टीमध्ये एकत्र भोजन करायचं,माफ त्यामध्ये डब्यात भलेही साधं जेवण का असेल तरी आनंदाने ग्रहण करून एकमेकांना देऊन आनंदाने पोट भरून जायचं, पण आता मात्र कोणाचा टिफिन भारी यात पण वेगळी स्पर्धा असते,मग आपला मोठेपणा दाखवण्यासाठी आहेच परत हे विकत घे ते विकत घे आणि त्यातून समाधान शोधायचं पण ते खरं समाधान नसतेच.
पूर्वी दप्तर फटलेल असलं तरी तेच शाळेत घेऊन गेलं तरी आनंद मिळायचा की आपल्याकडे पिशवीपेक्षा दप्तर आहे मग ते फाटलेलं का असेना तो एक वेगळा आनंद होता जो आताच्या कितीही महाग बॅगमधून मिळत नाही कारण त्या बॅगची खरी किंमत मनाला कळत नाही,जी त्या फाटक्या दप्तराची मनात रुजलेली असायची.
पूर्वी शिक्षणाला खर्च कमी केला जात होता परंतु शिक्षण मात्र आनंददायी मिळायचं, तेही फुकट,पण आता लाखो फी भरली की शिक्षण मिळते आणि त्यातून आनंद गोळा करायचा प्रयत्न केला जातो,खेळासाठी कधी पैसे न्हवते मोजावे लागतं, फुकट प्रत्येक खेळ शिकवले जायचे आणि आनंद वाटला जायचा परंतु आत परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे आता मात्र प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळी फी द्यावी लागते आणि विकत आपल्याला आनंद घ्यावा लागतो तो अगदी सहज प्राप्त होत नाही, काही खेळ हे आपोआप आत्मसात व्हायचे जे आनंद देऊन जायचे आज मात्र तोच खेळाचा आनंद देखील विकत घ्यावा लागतो.
परिस्थिती बदलतेय तशी लोकांची राहणीमानाची पद्धती बदलत जातेय,त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय आणि जसा दृष्टीकोन बदलतोय तश्याच लोकांच्या आयुष्याकडून अपेक्षा बदलत आहेत पूर्वी जे सुख फुकट मिळायचं तेच माणूस आता विकत घ्यायला तडफडतं असतो मग ते कोणत्याही गोष्टीमधले का असेना.
साध्या लपंडाव या खेळात सुद्धा गगनात मावनार नाही असा आनंद गवसायचा आता मात्र तो आनंद कुठे तरी हरवला ,आता शोधतात लोक तोच आनंद ऑनलाइन गेममध्ये पण तो काही मिळत नाही.
सांजवेळी पक्ष्यांचा थवा पाहत अंगणात गप्पा मारत बसायचं,सगळे सगेसोयरे,मित्रमैत्रिणी यांच्याशी हितगुज साधायचे ते साधताना तणावमुक्त वाटायचं, आयुष्यातील सुखदुःखांची देवाणघेवाण होऊन नात्यांमध्ये एक वेगळीच आपुलकी निर्माण व्हायची,त्या आपुलकीचा ओलावा प्रत्येकाच्या ह्रदयात जिवंत असायचा जो जगायला एक नवीन ऊर्जा द्यायचा ज्यातून आत्मिक समाधान मिळून खरा जगण्याचा आनंद प्राप्त व्हायचा पण आता मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी झाली आहे,इथे कोणालाच सुख आणि समाधान मिळेना झालंय कारण "आनंद महाग जो झालाय"....
- प्राजक्ता वाघमारे- सोनावणे