रशियामध्ये सुद्धा असाच एक नेता होऊन गेला, त्यांच्या होण्याने रशियाचा भूगोल, इतिहास बदलला, स्वातंत्र्य, समता यांचे मूल्य रशियाला भेटले, त्यांना शांततेचा नोबेल भेटला, ज्यांना पुर्ण जग शांतीदूत म्हणुन संभोधते असे मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. इतिहासाचे कालचक्र उलटे फिरत असताना, पुतीन सारखा नेता पुन्हा अखंड रशियाच स्वप्न पाहत असताना, जग पुन्हा शित युद्धाच्या खाईत लोटत असताना, मिखाईल गोर्बाचेव्ह यांच जगाचा निरोप घेणं खर त्रासदायक...
रशियन राज्यक्रांतीनंतरच्या पाऊणशे वर्षांत तिथल्या एकपक्षीय हुकूमशाही राजवटीचे, रक्तरंजित घटनांचे, साम्यवादाच्या पोलादी भिंतींचे चटके अनुभवलेल्या जगासाठी मिखाईल गोर्बाचेव्ह शांतिदूत ठरले. ग्लासनोस्त व पेरेस्त्राेयका हे दोन शब्द, सामान्य माणसांवरील निर्बंधांचे फास सैल करणारी, त्यांना मोकळ्या हवेत श्वासाची संधी देणारी धोरणे हे त्यांचे जगाला मोठे योगदान ठरले. ग्लासनोस्त म्हणजे सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणणारा, खुलेपणाचा, आपल्याकडील माहितीच्या अधिकारासारखा कार्यक्रम, तर पेरेस्त्रोयका म्हणजे सर्व पातळ्यांवरील पुनर्रचना. रशियन कवी येवगेनी येवतुशेन्को यांच्या रूपकानुसार, ग्लासनोस्त व पेरेस्त्रोयका म्हणजे अनुक्रमे हवा आणि जमीन. जमिनीचा पोत सुधरवण्यापेक्षा हवा शुद्ध करणे सोपे. या विचारांचे मूळ गोर्बाचेव्ह यांच्या बालपणात होते.
१९१७ च्या बोल्शेविक क्रांतीनंतर व्लादिमीर लेनिनच्या नेतृत्वात पूर्व यूराेप व उत्तर आशियातील अनेक प्रांत सोविएट युनियनच्या नावाने एकत्र आले. जगाच्या राजकारणाची फेरमांडणी झाली. गोर्बाचेव्ह यांच्या जन्मापूर्वी लेनिनचा मृत्यू झाला होता. त्याच्या दोन पावले पुढे असलेला जोसेफ स्टॅलिन नवा हुकुमशहा होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी बालपणीच दुष्काळाची होरपळ, दोन काका व आत्याचा त्यात मृत्यू, दोन आजोबांचा लेबर कॅम्पमधील छळ हे सारे अनुभवले. १९५३ मध्ये स्टॅलिनच्या मृत्यूनंतर निकिता क्रुश्चेव्ह यांच्या राजवटीत साेविएट रशियाचे डिस्टॅलिनायझेशन तरुण कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून त्यांनी जवळून अनुभवले. ५० व ६० च्या दशकात उद्योग, पायाभूत सुविधांपासून ते अंतराळापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये सोविएट रशियाने जी भरभराट केली, ती सामान्य माणसाच्या शोषणातून उभी राहिली होती. अमेरिकेला आव्हान देणाऱ्या त्या महासत्तेच्या विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रगतीचा पाया पोकळ होता. शेकडो बळी घेणारा चेर्नोबिल अणुभट्टीचा अपघात हा त्याचा पुरावा होता. त्या चुकीची गोर्बाचेव्ह यांनी जगापुढे कबुली दिली. अफगाणिस्तानावरील आक्रमण ही चूक व युद्धगुन्हा असल्याचेही निर्मळपणे मान्य केले.
१९८५ मधे जेव्हा मिखाईल गोर्बाचेव्ह अवघे ५७ वर्षाचे होते, तेव्हा ते रशियाचे सर्वेसर्वा बनले. पूर्व युरोपच्या साम्यवादी राष्ट्रांची जबाबदारी रशियाने झटकुन टाकली. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवसथेवरील जास्तीचा भार कमी झाला. १९८९ मधे त्यांनी अफगाणिस्तानमधील रशियन फौजांना मायदेशी परत बोलावून घेतले. हा काळ जगाच्या राजकारणात मोठा रोमँटिक काळ होता. ग्रेट ब्रिटन मधे सुधारणावादी मार्गारेट थॅचर होत्या, अमेरिकेमधे साहसवादी रोनाल्ड रेगन. हे तिघे अनेकवेळा जागतिक व्यासपीठावर एकत्र येत होते. अशाच एका परिषदेमध्ये रेगन यांनी गोर्बाचेव्ह यांना उद्देशून म्हणाले : ब्रेक द वॉल. त्याच वर्षी ९ नोव्हेंबर ला बर्लिन येथील पूर्व आणि पश्चिम जर्मनी ला विभागणरी भिंत कोसळली. साम्यवादी राजवटी तो अंत ठरला. शीतयुद्ध थंड झाल. नंतर निवडणुकीत गोर्बाचेव्ह यांचा पराभव झाला. सुटलेल्या वाऱ्यामुळे त्यांची लोकप्रियता कमी झाली. पण तरीही त्यांनी त्यांच्या तत्वांची कधी साथ सोडली नाही. त्यांनतर त्यांच्या पत्नीचे रईसा यांचे निधन झाले. त्यांनी राजकरण सोडले. पर्यावरणवादी मुद्द्यांवर ते काम करु लागले.
" अलीकडे खोट्या दागिण्यांपप्रमाणे खोटी लोकशाहीही लोकप्रिय होऊ लागली आहे " हे त्यांचे पुतीन यांच्याबद्दलची मते. मतपेटीद्वारेही हुकूमशाही येऊ शकते हे त्यानिमित्ताने सांगत.
अलीकडे रुग्णालयात गोर्बाचेव्ह यांची विचारपूस करायला गेलेले उदारमतवादी रशियन अर्थतज्ञ रस्लन ग्रींबर्ग बाहेर आल्यावर म्हणाले, " त्यांनी आम्हाला स्वतंत्र दीले, पण त्याचे करायचे काय हे आम्हाला उमगलच नाही. " एकाच आयुष्यात जगाचा इतिहास आणि भूगोल बदलणाऱ्या क्रांतिकारी शांतिदुताच्या स्मुर्तीस ' अक्षरलेखा ' परिवाराची आदरंजली..
आकाश अर्जुन दहे..
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली.
संदर्भ.
१) पुतीन - गिरीश कुबेर ( पुस्तक )
२) लोकसत्ता