मराठवाडा - मुक्तिसंग्राम

0

मराठवाडा म्हणजेच दक्षिणगंगा गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या प्रवाहाच्या रेषेत असलेला महाराष्ट्रातील एक भाग, याच नद्यांच्या पाण्याने स्वभावात, स्वरुपात एक वेगळी चव असणारी इथली माती आणि माणसं ! छत्रपती शिवरायांच्या पुर्वजांची साक्ष देणारी भुमी म्हणजेच मराठवाडा. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि घृष्णेश्वर, वैद्यनाथ, नागनाथ अशी ज्योतिर्लिंग विराजमान असणारी भुमी. प्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेणी, गुंफा, मंदिरे, अनेक संतांचे, पंथाचे, राजवटींचे, धर्मियांचे आश्रयस्थान असणारी भुमी. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी भुमी. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य, यादव आणि निजाम अशा वेगवेगळ्या राजवटी पाहणारी भुमी. आजच्या महाराष्ट्रात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातुर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांच्या भुमीला मराठवाडा म्हणुन ओळखले जाते. आणि याचा भूमीत मराठवाडा मुक्ती संग्राम घडला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान , जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. 



मराठवाडा मुक्ती संग्राम सुरुवात कोठून झाली?
औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतरच्या धामधुमीत सय्यद हुसेन अलीने मराठ्यांच्या मदतीने १७२० ला दिल्ली हस्तगत केली आणि निजामाला दक्षिणेचा सुभेदार नेमले. हैद्राबादला निजामाने स्वतंत्र राज्य घोषित केले. तेव्हापासुन हैद्राबादवर निजामाचा अंमल सुरु झाला. १९११ ला सत्तेवर आलेल्या शेवटचा निजाम मीर उस्मान अलीने पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना मदत केली. हैद्राबादला स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरु झाली. त्याने फारशीला राज्यभाषा केले. उर्दु ही शिक्षणाची भाषा केली. नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना प्रमाणापेक्षा जास्त लाभ दिला. यामुळे मराठवाड्यातील लोकांवर चारी दिशांनी सांस्कृतिक, सामाजिक आक्रमण व्हायला लागले. तिथुन मराठवाड्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जागृती सुरु झाली. त्यातुनच वेगवेगळ्या संस्था, व्यक्तिमत्त्व, साहित्य उदयाला आले.


मराठवाडा मुक्ती संग्राम माहिती

१९३८ ते १९४८ हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा प्रमुख कालखंड म्हणुन ओळखला जातो. वेगवेगळ्या राजकिय, विद्यार्थी चळवळी, जनआंदोलने आणि सशस्त्र आंदोलने या काळात झाली. ही सगळी आंदोलने व विरोध मोडुन काढण्यासाठी निजामाने कासीम रझवी याच्या माध्यमातुन रझाकार संघटनेची वाढ केली. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते. त्याने रझाकार संघटनेचा वापर करुन संस्थानात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा निजामाने प्रयत्न केला. आपले राज्य टिकवण्यासाठी त्याने अन्यायी मार्गाचा अवलंब केला. दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले. निजामाच्या हुकूमशाही राजवटीला उघडउघड आव्हान म्हणुन ७ ऑगस्टला भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस आणि १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणुन साजरा करण्याचे आवाहन केले गेले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळेमुळे खणुन काढण्यास सुरुवात झाली. निजाम सत्तेला शरणागती पत्करावी लागली. परंतु मानहानीमुळे चिडलेल्या निजामाने दुसऱ्या बाजुने रझाकरांच्या माध्यमातुन अत्याचार आणि रक्तपात सुरु केला.

                   स्वामी रामानंद तीर्थ

स्वातंत्र मिळाल्यानंतर उफाळलेला मराठवाडा मुक्ती संग्राम
निजाम राज्यातून मराठवाड्याला मुक्त करून भारतीय संघराज्यात सामील करण्यासाठी मुक्ती संग्राम लढा जोर धरू लागला. याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थयांनी करत संपूर्ण हैदराबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्राम तेवत ठेवला होता. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या तब्बल १ कोटी ६० लाख होती. हैदराबाद संस्थान मध्ये त्याकाळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग येत होते. मुक्तीसंग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. एका बाजूने रझाकारांचे अत्याचार सुरु असताना मुक्तीसंग्राम लढा पेट घेत होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिंगबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशंपायन, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा यासारख्या नेतृत्वाखाली हा संग्राम पुढे वाढत चालला होता. हा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा मराठवाडयाच्या गावागावात लढला गेला होता.

ऑपरेशन पोलो-मराठवाडा मुक्ती संग्राम

७ सप्टेंबरला वल्लभभाई पटेलांनी आपल्या सैन्यदलाला हैद्राबादवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला. १३ सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु झाले. १७ सप्टेंबरला निजामाने माघार घेतली. मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. यासाठी १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. हैद्राबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडले. तसेच मराठवाडा सहित स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीचाही डाव उधळुन लावला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषिक आधारे महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी जनरेटा निर्माण करण्यात मराठवाड्याचा मोठा वाटा होता. त्यानंतर १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.


मराठवाड्याच्या भुमीला आणि इथल्या लोकांना संघर्षाचा वारसा आहे. आताचा मराठवाडा निसर्गाशी, परिस्थितीशी त्याचबरोबर सरकारी उदासीनतेशी संघर्ष करत आहे. शेतकरी आत्महत्यांनी ही भुमी ग्रस्त झाली आहे. मराठवाड्यात रोजगार, विकास, प्रकल्प, पायाभुत सुविधा, शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यात अपयशी ठरलेले मराठवाड्यातील नेतृत्व मात्र आपल्या अपयशाचे खापर पश्चिम महाराष्ट्रावर फोडुन प्रांतवादाची मानसिकता रुजवत आहे. भावनिक विषयांना हात घालुन जातींची समीकरणे जोपासत आपापली राजकीय सत्ता भोगत आहेत. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मराठवाड्याच्या शाश्वत विकासाची स्वप्नं पाहणारीही एक पिढी आता तयार होत आहे. त्या पिढीच्या हातुन मराठवाड्याच्या समृद्धीचं काम व्हायला सुरुवात झाली आहे. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुक्तीसंग्रामात योगदान देणाऱ्या सर्व शहिदांना विनम्र अभिवादन.

ओंकार शेलार
सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top