लहानपणापासून घरात आई-वडील वारकरी संप्रदायाला मानणारे असल्यामुळे तुझे नाव कुठे ना कुठे कानावर पडत होते. जसे जसे मोठे होत गेलो तुझ्याबद्दल जास्त ऐकत गेलो. आठवी नववीला असताना तालुक्याच्या ठिकाणी मुंबादेवी मंडळातर्फे ' तुका झालासी कळस ' हा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी गणेश महाराज वाघमारे यांचे तुझ्याबद्दल प्रवचन असायचे. वडिलांच्या मांडीला मांडी लावून ते मी ऐकायला जायचो. रात्री प्रवचन झाल्यानंतर वडील अजून जास्त तुझ्याविषयी सांगायचे. तेव्हा एवढे काय कळायचे नाही. पण आता कुठे तुला समजायला लागलोय. तुझे वडील लवकर गेले, तू घराची पुर्ण जबाबदारी सांभाळली. दुष्काळ पडल्यावर तुझ्या घरातले अन्न गरीब जनतेला वाटून दिले आणि
जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले |
तोची साधू ओळखावा | देव तेथेची जाणवावा |
या तुझ्या उक्तीप्रमाणे तू वागला. या गोष्टिमुळे तू आणि तुझे घर कधी कधी उपाशी झोपले. लोकांच्या वेदना तुला समजायला लागल्या तेव्हा तू तुझ्या सावकारकीचा धंदा सोडला, सावकारकीची सर्व लिखापटी तु पाण्यात बुडावली. अभंग करायला लागला, पांडुरंगाची भक्ती करायला लागला, संस्कृत मध्ये अभंग करून, तू त्या वेळच्या कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणांना आव्हान दिली. ते तुझी लोकप्रियता सहन करू शकले नाही म्हणून रामेश्वर भट्ट आणि बंबाजी बुवाने मिळून धर्मपिठाकडे तक्रार केली. शूद्र लोक ब्राह्मणांची भाषा बोलायला लागली, संस्कृत शिकू लागले, काही ब्राह्मणांना वश करू लागले असा त्यांचा तक्रारीचा मुद्दा. तू धर्मपिठा पुढे उभे राहून त्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. मी तुझ्याकडूनही त्यामुळे एक गोष्ट शिकलो बहुमत असत्याकडे असेल आणि एकटा सत्यसोबत उरला तरी डगमगायाचं नाही.
सत्य असत्याशी मन केले ग्वाही |
मानियेले नाही बहुमता ||
तुझ्यासारखा पर्यावरणवादी मी पाहिला नाही, सोळाव्या शतकात तुला पर्यावरणाची चिंता होती. तू तुझ्या ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ' या अभंगातून ते दाखवून दिलं. तुला विद्रोही तुकाराम पण म्हणतात कारण त्या काळात तू प्रस्थापितांच्या विरुद्ध विद्रोह करून गरीब जनतेला योग्य दिशा दाखवण्याचे काम केले. तुझी अभंगाची गाथा इंद्रायणीत बुडवायला लावली ती तुझ्यासाठी एक प्रकारच्या आत्महत्याच होती. पण तरी तू त्या सर्व गोष्टींना धैर्याने पुढे गेला म्हणूनच मला तुला असे म्हणूशी वाटते
सांगून उरतो | खलांना पुरतो |
गाडून उगतो | तुकाराम |
आकाश अर्जुन दहे..