चित्रातील व्यक्तीला कोण ओळखत नाही !
लिओ टॉलस्टॉय. ( रशियन उच्चार- ल्येफ् तलस्तोइ) 'वॉर ऍण्ड पीस' व ' आना करनिना' ह्या जगप्रसिध्द कादंबरयांचे रशियन लेखक. १९ व्या व २० व्या शतकातील क्वचीतच एखादा प्रोग्रेसीव लेखक/ विचारवंत असावा ज्याच्यावर टॉलस्टॉय च्या लेखनाचा प्रभाव पडलेला नसेल. ( गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत असताना काढलेला टॉलस्टॉय फार्म आठवा)
चित्रकार आहे मिखइल नेस्तीरफ्.. चित्रातील दोन गोष्टींकडे लक्ष वेधू इच्छितो - ज्या टॉलस्टॉयंच्या संपूर्ण जीवनाशी व कार्याशी-लेखनाशी जोडलेल्या आहेत. - त्यांच्या विचारधारेच सार ! पहिली गोष्ट- चित्र जिथं काढलं गेलं ते ठिकाण - टॉलस्टॉयंची मात्रोपार्जित ( जशी वडिलोपार्जित असते) फॅमिली इस्टेट - ' यास्नया पल्याना'. मॉस्कोच्या नैऋत्य दिशेत २०० किमी अंतरावर तुला प्रांतात असलेली ही २ हजार एकराची इस्टेट- जिथं टॉलस्टॉय यांचा जन्म गर्भश्रीमंत जमीनदार घराण्यात झाला, जिथं त्यांचं बालपन गेलं, व जिथं वॉर ऍण्ड पीस व आना करनिनाचं लिखाण झालं. ही इस्टेट, इथलं घर, इथलं मोठ्ठ तळं-जिथं ते अंघोळीला जात, इथल्या बागा व शेतं व त्यावर राहणारी- काम करणारी शेतमजुरे, त्यांच्या मुलांसाठी टॉलस्टॉयनी स्वतः काढलेली-चालवलेली शाळा - हे सर्व त्यांना इतकं आवडायचं की यास्नया पल्याना ही त्यांच्यां जीवनाचा भाग बनुन गेली- त्यांची सर्वात प्यारी गोष्ट. त्यांच्यां इच्छेनुसार मृत्युनतंर त्यांना इथेच एका छोट्या बागेत दफन करण्यात आलं. कब्रीवर काहीच लिहलेल नाही- फक्त हिरवं गवत आहे.- त्यांच्याच इच्छेनुसार !
आज ही इस्टेट व त्यावरील टॉलस्टॉय च्या घराचे म्युझीयम करण्यात आलं आहे. त्यांच्या जवळपास सर्व वस्तु- त्यांची लायब्ररी २०००० पुस्तकांसहीत, त्यांनी काढलेली शाळादेखील- तिथं आहेत.
( गंमत - जीव की प्राण असणारी ही पुर्ण इस्टेट टॉलस्टॉय ऐन तिशीत तीन पत्ती खेळत असताना तात्पुरता हारुन बसले होते.)
चित्रातील दुसरी व महत्वाची गोष्ट - ती म्हणजे टॉलस्टॉयनी घातलेला शेतमजुराचा (peasant) पोषाख ! एखादा गर्भश्रीमंत सरंजामदार साध्या मजुराच्या पोषाखात का बरं चित्र काढुन घेईल? प्रश्नाचं उत्तर म्हणजे टॉलस्टॉयंच्या जीवनाचं सार व संघर्ष आहे. उच्चकुलीन कुटुंबात- संस्कृतीत जन्मलेला व वाढलेला हा लेखक तसा मानसिकतेने-विचारधारेने खुपच वेगळा होता, बंडखोर होता. ऍरिस्टाक्रसीचे जवळजवळ सगळे अग्रहक्क-सोयी त्यांनी नाकारले. बांडगुळी जीवनाला लाथ मारुन त्यांनी स्वकष्टाचं जगनं स्वीकारलं. जमीनदार व शेतमजुर हा भेदभावच त्यांनी नष्ट करुन टाकला. शेतमजुरांच्यात राहुन, तिथं काम करुन त्यांचं जीवन समरसपणे जगणे हे त्यांच्यां आयुष्याचं ध्येय बनलं. म्हणूनच त्यांनी इस्टेटीवरील खुपशी जमीन मजुरांना दिली, त्यांच्या मलांसाठी शाळा काढली, मनोरंजन व शिक्षणासाठी स्वतः बालकथा लिहल्या, ( ज्या आजही रशियात लहान मुलांना तोंडपाठ असतात) मजुरांच्या प्रबोधनासाठी प्रकाशनगृह काढुन चालवलं. सर्वाथाने त्याग हा त्यांच्या जीवनाचा पाया बनला. इतकं की सुरवातच्या काळातील लेखनाचे कॉपीराइट हक्कही नंतर त्यांनी नाकारले. एका 'आहे-रे' वर्गातील माणसात झालेला हा बदल म्हणजे एक प्रकारची समाजक्रांतीची सुरवातच होती.म्हणूनच लेनीनने टॉलस्टॉयना( टिका करत असताना देखील) ' टॉलस्टॉय- आमच्या क्रांतीचा आरसा' असं म्हटलं होतं. ( टॉलस्टॉय यांचा क्रांतीकारकांच्या एक्सट्रीमीज्म व हिंसेला पाठींबा नव्हता.)
आयुष्याच्या उत्त्तर्धात टॉलस्टॉय रशियामध्ये खुपच प्रसिद्ध झाले ते लेखक म्हणून नव्हे तर जुलमी झारशाही व तिच्या अन्यायकारक संस्था- नोकरशाही, ऍरिस्टाक्रसी, पोलीसयंत्रना,ज्युडिशरी व प्रस्थापित ओर्थडोक्स चर्च- ह्यांच्या विरोधात आवाज उठविणारा एक सामाजिक व धार्मिक बंडखोर म्हणून..!! त्यांनी आपल्या शेवटच्या कादंबरी 'रेझरेक्शन' ( Resurrection जी त्यावेळी त्यांची सर्वात जास्त वाचली- चर्चेली गेलेली कादंबरी! इतकी की एका क्रिटीक नुसार १९ व्या शतकात रशियन साहीत्यात अस काही घडलेलं नव्हतं)मधुन राज्ययंत्रना व चर्चच्या ढोंगीपणावर उघडपणे हल्ला चढवला- जे तेव्हापर्यंत कुठल्याही रशियन लेखकाने इतक्या स्पष्टपणे केलं नव्हतं. टॉलस्टॉय यांना प्रस्थापित चर्चचा अर्थशुन्य प्रथा-परंपरेमध्ये अडकवून ठेवलेला धर्म मान्य नव्हता, त्यांच्या धर्माला अध्यातमाची किनार होती.- फुले व गांधीच्या धर्मसंकल्पने सारखी. बंधुभाव, प्रेम व अहींसा ही टॉलस्टॉयंच्या धर्माची मुलतत्वे झालीत. देव व मनुष्य यांच्यात चर्चची मक्तेदारी नको. रशियात स्वत:चा मार्टीन ल्युटर १९ व्या शतकात हा असा आला, जो आपल्या महाराष्ट्रात महात्मा फुल्यांच्या नावाने आला. टॉलस्टॉयंच्या विचारांना प्रचंड लोकपाठींबा मिळाला. टॉलस्टॉलीयन नावाचा पंथच तयार झाला .त्यांची लोकप्रियता किती असावी! झारशाहीला सपोर्ट करणारा एक संपादक- ए. सुवोरीन १९०१ मध्ये लिहतो- 'सध्या रशियात दोन झार (सम्राट) आहेत: निकोलस दुसरा व लिओ टॉलस्टॉय ! कोण शक्तीशाली आहे? निकोलस तर टॉलस्टॉयला हात लावु शकत नाहीये, तर टॉलस्टॉय मात्र निकोलसचं सिहांसन खिळखिळं करत आहे नक्की !' ‘रशियामध्ये एखादा थोर लेखक म्हणजे प्रतिसरकार होय. ' शंभर वर्षांनी बंडखोर रशियन लेखक अलेक्सांद्र सोल्जेनित्सन यांनी काढलेले उदगार हे टॉलस्टॉयला तंतोतंत लागू पडतात.
टॉलस्टॉयंच्या बंडाची भाषा इतकी त्रीव्र होती की प्रस्थापित चर्चने त्यांना कायमचं धर्मबहिष्कृत केलं - अशी शिक्षा मिळणारा पहीला मोठ्ठा रशियन लेखक ! शेवटी जेव्हा त्यांचा मृत्यु झाला, चर्चने त्यांना अधिकृत दफनविधी सुध्दा नाकारला, जो त्या दिवशी उपस्थित असणारया हजारो लोकांनी चर्चचा आदेश धुडकावुन स्वतः दिला..
आज आमच्या मातीतसुध्दा संरजाम- जमीनदार घराण्यात जन्मलेले मोठ्ठे नावाजलेले लेखक आहेत. साहीत्य क्षेत्र सोडुन दुसरीकडे कुठे त्यांची टॉलस्टॉयीन बंडगीरी दिसत नाही..
Irshad Vadagaonkar
संशोधक विद्यार्थी,
सेंटर ऑफ रशियन स्टडीज
जेएनयू